दारूच्या तस्करीसाठी बनविला विशेष कोट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 08:10 PM2018-04-07T20:10:25+5:302018-04-07T20:10:45+5:30
लग्न समारंभासाठी अनेकजण दुकानातून रेडिमेड कोट विकत घेतात किंवा टेलरकडून बनवून घेतात. परंतु चंद्रपूरच्या एका युवकाने आपली शक्कल लढवून खास दारूच्या तस्करीसाठी एक कोट तयार करून घेतला. त्यात दारूच्या बॉटल ठेवण्यासाठी ३० कप्पे तयार केले. कोट घेऊन नागपुरात आला. कोटात दारूच्या ३० बॉटल्स भरून त्यावर शर्ट घातले. परंतु आरपीएफ जवानांची करडी नजर त्याच्यावर गेल्यामुळे त्यास अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्न समारंभासाठी अनेकजण दुकानातून रेडिमेड कोट विकत घेतात किंवा टेलरकडून बनवून घेतात. परंतु चंद्रपूरच्या एका युवकाने आपली शक्कल लढवून खास दारूच्या तस्करीसाठी एक कोट तयार करून घेतला. त्यात दारूच्या बॉटल ठेवण्यासाठी ३० कप्पे तयार केले. कोट घेऊन नागपुरात आला. कोटात दारूच्या ३० बॉटल्स भरून त्यावर शर्ट घातले. परंतु आरपीएफ जवानांची करडी नजर त्याच्यावर गेल्यामुळे त्यास अटक करण्यात आली.
रत्नाकर टिकाराम नंदनवार (२६) रा. चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यप्रकाश सिंह, गोविंद एडले, उषा तिग्गा, रजनलाल गुर्जर, केदार सिंह हे शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर गस्त घालत होते. त्यांना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळली. तिची तपासणी केली असता शर्टाच्या आतमध्ये खास तयार करून घेतलेल्या कोटाच्या कप्प्यात दारूच्या २८८० रुपये किमतीच्या १८ बॉटल्स ठेवल्या होत्या. लगेच त्यास अटक करून मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. दुसऱ्या घटनेत सायंकाळी ५.१५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर मुंबई एण्डकडील भागात एका बेवारस बॅगमध्ये दारूच्या १७४२ रुपये किमतीच्या ६७ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.