मतदार यादीत नाव नोंदणीसाठी तृतीयपंथीय व दिव्यांगांना दस्तऐवजामध्ये विशेष सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 07:46 PM2021-11-17T19:46:57+5:302021-11-17T19:47:57+5:30
Nagpur News मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत शहरातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
नागपूर : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षणाला सुरुवात झाली आहे. या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत शहरातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
दिव्यांग, तृतीयपंथीकरिता वय, पत्ता याबद्दल येत असलेल्या अडचणी लक्षात घेता आवश्यक दस्तऐवजाबाबत निवडणूक आयोगाद्वारे विशेष सवलत देण्यात आली आहे. नाव नोंदणीची सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे.
दिव्यांगांसाठी विशेष पीडब्ल्यूडी ॲप
निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी विशेष पीडब्ल्यूडी या ॲपची सोय केलेली आहे. त्यावरून दिव्यांग मतदारांना नाव नोंदणी करता येईल. ज्यांचे आधीच नाव नोंदणी झालेली आहे, पण दिव्यांग म्हणून नोंद नसेल त्यांना या ॲपवरूनच दिव्यांगत्व चिन्हांकित करण्याची सोय आहे. दिव्यांगत्व चिन्हांकित झाल्यानंतर या मतदारांना मतदानाच्या वेळी पोस्टल मतपत्रिका, चाकाची खुर्ची, वाहन, आदी सुविधा पुरविणे निवडणूक कार्यालयासाठी सोयीचे ठरते.
तृतीयपंथींना दस्तऐवजात सवलत
मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी वयाचा आणि निवासाचा दाखला आवश्यक असतो. मात्र, तृतीयपंथी, देह व्यवसायात असणाऱ्या महिलांना या दस्तावेज सादर करणे कठीण जाते. यासाठी राज्य मुख्य निवडणूक विभागाने विशेष सोय केली आली आहे. त्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करताना वय आणि निवासाचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही. तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया यासारख्या वंचित घटकांनी ते जिथे राहतात तो पत्ता अर्जात नमूद करून अर्ज दाखल करणे महत्त्वाचे आहे. नाव पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज क्रमांक ८ भरून त्यांचे आधीचे नाव, लिंग यामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा आहे.
सोशल मीडियाचा वापर
नागपूर शहरातील पात्र प्रत्येक व्यक्तीला मताधिकार बजाविता यावा यासाठी नागपूर मनपाद्वारे मतदार नोंदणी जनजागृतीसाठी आवाहन करणारी सोशल मीडियावरून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या पेजवरून नागपूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्हिडिओद्वारे मतदार नोंदणीसाठी आवाहन करीत आहेत.