नागपुरात कोरोना उपाययोजनांसाठी विशेष समन्वय समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 10:35 PM2020-03-11T22:35:54+5:302020-03-11T22:38:57+5:30
कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप लक्षात घेता नागपुरातील जिल्हा प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप लक्षात घेता नागपुरातील जिल्हा प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जिल्हाधिकारी व आरोग्य विभाग तसेच इतर आवश्यक विभागांशी समन्वय साधून आवश्यक कारवाई करेल. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका, आरोग्य विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि इतर सर्व संबंधित विभागात योग्य समन्वयातून टीम यावर लक्ष ठेवणार आहे. कोरोना संशयिताबाबतची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी समन्वय ठेवण्यात येणार असून, संशयित हा इतर जिल्ह्यातून आला असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी समन्वय साधण्यात येईल.
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्या
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी आणि त्यापैकी एखाद्या प्रवाशास ताप, खोकला असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. कोरोना चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्त जोखमीच्या व्यक्तींची चाचणी करावी तसेच कमी जोखमीच्या व्यक्तींनी १४ दिवस घरीच थांबण्यास सांगावे. अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्यासाठी नागपुरात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, रेल्वे विभागाकडेही २०० बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी केले. रुग्णांचे स्क्रीनिंग, संशयित रुग्णांच्या प्रयोगशाळा चाचण्या आणि आरोग्य शिक्षण या बाबींसाठी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोटोकॉल रुग्णालयातील विशेषज्ञांनी तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करणार
कोरोना विषाणूंच्या भीतीमुळे नागरिकांनी अजिबात घाबरुन जाऊ नये. तसेच विक्रेत्यांनी मास्कचा मानवनिर्मित तुटवडा निर्माण केल्यास किंवा निर्धारित दरापेक्षा जास्त किमतीला विकत असल्याचे आढळून आल्यास आणि बोगस मास्कची विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी संबंधित विभागाला दिले.