रा.स्व. संघाच्या देशभरातील स्वयंसेवकांकरिता खास महाराष्ट्रीयन भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:49 AM2018-03-10T10:49:13+5:302018-03-10T10:49:20+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेला देशभरातून आलेल्या स्वयंसेवकासाठी खास महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेला देशभरातून आलेल्या स्वयंसेवकासाठी खास महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत आहे. सोबतच नाश्त्यात नागपूरची प्रसिद्ध संत्राबर्फी आणि नागपूरच्या उकाड्याची दाहकता जाणवू नये म्हणून ताक स्वयंसेवकांच्या भोजनात आहे. स्वयंसेवकाच्या सरबराईत भाजयुमोचा सक्रिय सहभाग आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेचे संघ वर्तुळात विशेष महत्त्व असते. या प्रतिनिधी सभेत देशभरातून संघ आणि संघप्रणित संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतात. यात काही बौद्धिक मार्गदर्शनाबरोबर संघ भविष्यात कुठल्या अजेंड्यावर कार्य करणार आहे, याबाबत पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन असते. शुक्रवारपासून रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात या प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली आहे. देशभरातून संघाच्या स्वयंसेवकाबरोबरच संघप्रणित संघटनांचे १५३८ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तीन दिवसांचे हे बौद्धिक व मार्गदर्शनपर सत्रासाठी आलेल्या स्वयंसेवकांच्या राहण्यापासून खाण्यापर्यंत सर्व आयोजन स्मृतिमंदिर परिसरात करण्यात आले आहे. संघाचे स्वयंसेवक विविध प्रांतातील असले तरी, त्यांना महाराष्ट्रीयन भोजनाचाच आस्वाद घ्यावा लागत आहे. सकाळी नाश्त्यामध्ये उपमा, पोहे, यासोबतच नागपूरची प्रसिद्ध संत्राबर्फी होती. भोजनामध्येही पत्ताकोबी, वरण व चपाती आणि भात हे पदार्थ होते. त्याचबरोबर ताक स्वयंसेवकासाठी विशेषत्वाने होते. ही प्रतिनिधी सभा संघाच्या स्वयंसेवकांसाठी महत्त्वाची असल्याने, सरसंघचालकांचे मार्गदर्शन आणि भविष्यातील कामाचा अजेंडा ठरविण्यात येत असल्याने, भोजनाचे काही विशेष महत्त्व नसते.