विशेष हक्कभंग! छगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 01:43 PM2018-07-18T13:43:32+5:302018-07-18T15:33:52+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे.
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी याबाबत विधानसभेत विशेष हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावास सर्वपक्षीय नेत्यांनी सहमती दर्शवली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी शिवीगाळ केली आहे. भुजबळ यांचा काहीही संबंध नसताना या पोलिसाने तिथे जाऊन त्यांना शिवीगाळ केली. अधिकारी मुजोर झाले आहेत. महाराष्ट्रातील आमदारांची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये कडक संदेश जाणे आवश्यक आहे. त्यासाठी श्रीगोंद्याचे महावीर जाधव यांचे तात्काळ निलंबन करा, असा विशेष हक्कभंग प्रस्ताव राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात मांडला होता. त्यास सर्वपक्षीय नेत्यांनी सहमती देत हा प्रस्ताव पास केला. त्यानंतर, महावीर जाधव यांचे निलंबन करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले. दरम्यान, विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली होती.