विदर्भ-मराठवाड्यातील कृषिपंपांच्या विजेसाठी विशेष योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 07:40 PM2017-12-20T19:40:27+5:302017-12-20T19:43:25+5:30
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत आॅक्टोबर अखेरपर्यंत २६ हजार ३५६ कृषिपंपांना वीज जोडणी करण्यात आली आहे. विदर्भ व मराठवाड्यातील कृषिपंपांच्या वीज जोडणीकरिता विशेष योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
सदस्य अब्दुल सत्तार, कुणाल पाटील, यशोमती ठाकूर, निर्मला गावित आदींनी विदर्भ व मराठवाड्यातील कृषिपंपाचा अनुशेष दूर करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे की, विदर्भ व मराठवाड्यामध्ये मार्च २०१६ अखेर ८६ हजार ८७० कृषिपंपांना वीज जोडणी प्रलंबित होती. सन २०१६-१७ मध्ये विविध योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील ७१ हजार ९४४ कृषिपंपांना वीज जोडणी करण्यात आली. सन २०१७-१८ मध्ये आॅक्टोबर २०१७ अखेर २६ हजार ३५६ कृषिपंपांना जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित कृषिपंपांचे वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.