विदर्भात धावणार पर्यटन विशेष बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:08 AM2020-12-24T04:08:12+5:302020-12-24T04:08:12+5:30
विदर्भात धावणार पर्यटन विशेष बसेस जानेवारीत होणार श्रीगणेशा : नववर्षात एसटीची प्रवाशांना भेट दयानंद पाईकराव नागपूर : विदर्भात अनेक ...
विदर्भात धावणार पर्यटन विशेष बसेस
जानेवारीत होणार श्रीगणेशा : नववर्षात एसटीची प्रवाशांना भेट
दयानंद पाईकराव
नागपूर : विदर्भात अनेक पर्यटनस्थळे आहेत. यात धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांचा समावेश आहे. परंतु अद्याप या पर्यटनस्थळांसाठी एसटी महामंडळातर्फे विशेष बसेस सुरू करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे नववर्षात प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने विदर्भात पर्यटन विशेष बसेस चालविण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भात १२ बसेस चालविण्यात येणार असून त्याचा श्रीगणेशा जानेवारी महिन्यात होणार आहे.
कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही एसटी महामंडळाकडे निधी उपलब्ध नव्हता. मात्र या परिस्थितीतून सावरत एसटी महामंडळाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. यात बसेसचे ट्रकमध्ये रुपांतर करून माल वाहतूक करणे, खासगी गाड्यांचे टायर रिमोल्डींग करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यात धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांसाठी एसटीच्या बसेसही सोडण्यात येतात. परंतु पर्यटनासाठी विशेष बसेसचे नियोजन यापूर्वी एसटी महामंडळाने केले नव्हते. परंतु नववर्षात या पर्यटनस्थळांसाठी विशेष बसेस सुरु करण्यात येणार आहेत. यात दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, खिंडसी, रामटेक, माहुर, चिखलदरा, शेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील सहस्रकुंड आदी स्थळांचा समावेश आहे. त्यानुसार एखाद्या धार्मिक स्थळावर जाण्यासाठी सकाळीच एसटीची विशेष बस सोडण्यात येईल. प्रवासात प्रवाशांना भोजनासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. त्यानंतर दर्शनासाठी ठराविक वेळ देऊन दर्शन आटोपल्यानंतर भाविकांना पुन्हा त्यांच्या गावाला पोहोचविण्यात येणार आहे. तर नैसर्गिक पर्यटनस्थळीही पर्यटकांना पुरेसा कालावधी फिरण्यासाठी देऊन परत येण्याची वेळ सांगितली जाईल. प्रवासी आल्यानंतर ते बसमध्ये बसून आपल्या गावी परत येतील. या उपक्रमाला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. टप्प्याटप्याने विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पर्यटन विशेष बसेस सुरु करण्याचा मानस एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.
................
नागपुरातून सुरु होती फुलराणी
साधारणपणे सहा ते सात वर्षांपूर्वी नागपुरातुन फुलराणी नावाची पर्यटन विशेष बस सुरु होती. यात सहा ते सात स्थळांचा समावेश होता. सकाळी बसमध्ये बसल्यानंतर पर्यटकांना सहा ते सात ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सायंकाळी ही बस नागपुरात परत येत होती. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसादही मिळत होता. परंतु कालांतराने ही बस बंद करण्यात आली होती.
...............
पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल
‘विदर्भात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी एसटी महामंडळातर्फे पर्यटन विशेष बसेस सुरू करण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्यात या बसेसची सुरुवात होणार आहे. यामुळे पर्यटकांना सुविधा होऊन परिणामी एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.’
-शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती ३, मुंबई
.............