विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केंव्हा?
By Admin | Published: October 16, 2015 03:13 AM2015-10-16T03:13:51+5:302015-10-16T03:13:51+5:30
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो भाविक नागपुरात येतात.
सुरक्षा यंत्रणेने घेतला धसका : भाविकांचीही होणार गैरसोय
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो भाविक नागपुरात येतात. सोहळा आटोपल्यानंतर त्यांच्या परतीच्या प्रवासाची तयारी सुरू होते. भाविकांचे लोंढेच्या लोंढे रेल्वेस्थानकाकडे परततात. भाविकांच्या गर्दीसाठी रेल्वे प्रशासन सोहळ्याच्या १० ते १२ दिवस आधी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करते. परंतु हा सोहळा सहा दिवसांवर आला असताना अद्याप एकाही रेल्वेगाडीची घोषणा न केल्यामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणेने धसका घेतला असून भाविकांची गर्दी कशी आटोक्यात आणावी, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणेला पडला आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. रेल्वे प्रशासन सर्वाधिक गर्दी असलेल्या मुंबई-पुणे मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करते. या रेल्वेगाड्यांमुळे भाविकांची मोठी सोय होते. भाविकांनाही लवकर रेल्वेगाड्या मिळाल्यामुळे रेल्वे सुरक्षा दल तसेच लोहमार्ग पोलिसांवरील कामाचा ताण कमी होतो. परंतु यावर्षी हा सोहळा सहा दिवसांवर आलेला असताना अद्यापही रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या संदर्भात भूमिका घेतली नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने त्याचा धसका घेतला आहे. रेल्वेस्थानकावर भाविकांची गर्दी झाल्यास त्याचा मनस्ताप सुरक्षा यंत्रणेलाच होणार आहे. दोन दिवसांपूर्वी लोहमार्ग पोलीस अप्पर महासंचालक डी. कनकरत्नम यांनी नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला.
या दौऱ्यातही त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. यावरून या विशेष रेल्वेगाड्या सुरक्षा यंत्रणेसाठी किती महत्त्वाच्या आहेत, याची कल्पना येते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लवकरच याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)