सुट्यांमध्ये विशेष रेल्वेगाड्या
By admin | Published: November 1, 2016 02:41 AM2016-11-01T02:41:52+5:302016-11-01T02:41:52+5:30
दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा
नागपूर : दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे वेटिंगचे तिकीट असलेल्या प्रवाशांना आरामात प्रवास करणे शक्य होणार आहे.
अजनी-पुणे
रेल्वे प्रशासनाने विशेष शुल्कावर अजनी-पुणे-अजनी सुपरफास्ट वातानुकूलित रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२१२४ अजनी-पुणे सुपरफास्ट वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवारी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी वर्ध्याला रात्री ८.५०, धामणगाव ९.३५, बडनेरा १०.३७, अकोला ११.४० आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२१२३ पुणे-अजनी सुपरफास्ट वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी पुण्यावरून १८ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता सुटेल. ही गाडी धामणगावला दुसऱ्या दिवशी रात्री ३.०२, वर्धा ३.४०, अजनीला पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, दौंड येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात एकूण १६ कोच असून त्यात १ फर्स्ट एसी, ४ टु टायर, ९ थ्री टायर आणि २ पॉवर व्हॅन कोच आहेत. दोन्ही गाड्यांचे अरक्षण १७ आॅक्टोबरला सुरू होणार आहे.
नागपूर-अमृतसर सुपरफास्ट एसी रेल्वेगाड्या
रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी क्रमांक ०२१२५ नागपूर-अमृतसर सुपरफास्ट वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून १२ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५.५० वाजता सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी अमृतसरला दुसऱ्या दिवशी रात्री ९.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२१२६ अमृतसर-नागपूर सुपरफास्ट वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी अमृतसरवरून १४ नोव्हेंबरपर्यत प्रत्येक सोमवारी पहाटे ४.२० वाजता सुटून नागपूरला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आगरा, नवी दिल्ली, अंबाला, लुधियाना, जालंधर येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात १ फर्स्ट एसी, २ टु टायर एसी, ९ थ्री टायर एसी कोच आहेत.
प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेस्थानकावर गर्दी वाढली
दिवाळीनिमित्त अनेकांनी प्र्रवासाचा बेत आखल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर गर्दी वाढली आहे. मंगळवारी भाऊबीज असल्यामुळे या सणासाठी रेल्वेगाड्यातील गर्दी आणखीनच वाढली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या सर्वच प्लॅटफार्मवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या शेजारील आरक्षण कार्यालयात तसेच आरपीएफ शेजारील चालू तिकीट कार्यालयात प्रवाशांच्या तिकीट काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या. सेकंड क्लास वेटिंग रुम, लेडीज वेटिंग रुम आणि एसी वेटिंग हॉलमध्येही प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळाली. कोचमध्ये उभे राहण्यासाठी जागा उरलेली नसल्याने प्रवासी मोठ्या संख्येने कोचच्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवास करताना दिसले. प्रवाशांची ही गर्दी आणखी पाच दिवस अशीच कायम राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.