कामगार रुग्णालयात आता विशेषज्ञांची सेवा : सात जागा भरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:52 PM2020-10-10T23:52:07+5:302020-10-10T23:54:21+5:30
Employees Hospital, Specialist Doctors, Nagpur News कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात विशेषज्ञांच्या १४ पैकी तब्बल ११ जागा रिक्त होत्या. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त लावून धरले. यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित झाले. अखेर रुग्णालय प्रशासनाला विशेषज्ञांची पदे भरण्याचे अधिकार देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात विशेषज्ञांच्या १४ पैकी तब्बल ११ जागा रिक्त होत्या. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त लावून धरले. यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित झाले. अखेर रुग्णालय प्रशासनाला विशेषज्ञांची पदे भरण्याचे अधिकार देण्यात आले. यामुळे नुकतेच नेत्र रोग, शल्यचिकित्सा, बधिरीकरण, छाती रोग, अस्थिव्यंगोपचार, मानसोपचार व पॅथॉलॉजिस्ट तज्ज्ञाची पदे भरण्यात आली.
सोमवारीपेठ येथील कामगार विमा रुग्णालयाशी तीन लाखांवर कामगार जुळले आहेत. त्यांचे कुटुंब धरून ही संख्या १२ लाखांवर जाते. या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी या रुग्णालयावर आहे. रुग्णांना विशेषज्ञाची सेवा मिळावी म्हणून अस्थिव्यंगोपचार, मानसोपचार, औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन), शल्यचिकित्सक, पॅथॉलाजिस्ट, बालरोग, बधिरीकरण, ईएनटी, नेत्ररोग, श्वसनरोग, रेडिओलॉजी आणि स्त्रीरोग व प्रसूती आदी १४ विशेषज्ञाच्या पदांना मंजुरी देण्यात आली. परंतु दरम्यानच्या काळात रिक्त होत गेलेली पदे भरण्यातच आली नाही. विशेषज्ञांच्या रिक्त पदाची जबाबदारी प्रशासनाने पार्ट टाईम डॉक्टरांवर टाकली होती. परिणामी, मेडिकलमध्ये रुग्णांना ‘रेफर’ करण्याचे प्रमाण वाढले होते. ‘लोकमत’ने ‘विशेषज्ञांच्या १४ पैकी ११ जागा रिक्त’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल तत्कालीन आ. प्रकाश गजभिये यांनी घेतली. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोप यांनी रिक्त पदे शासनाकडून नियमित पदे भरले जातील, असे लेखी उत्तर दिले. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाला विशेषज्ञाची पदे भरण्याचे अधिकार दिले. मागील महिन्यात नेत्र रोग, शल्यचिकित्सा, छाती रोग, बधिरीकरण, अस्थिव्यंगोपचार, मानसोपचार व पॅथॉलॉजिस्ट तज्ज्ञांच्या पदांची जाहिरात काढून कंत्राट पद्धतीवर ही पदे भरण्यात आली. यातील काही पदांवर जुनेच डॉक्टर कायम आहेत. यामुळे त्यांच्या रुग्णसेवेकडेही अनेकांचे लक्ष राहणार आहे.
रुग्णसेवेत सुधार होईल
रुग्णालयात विशेषज्ञांच्या रिक्त जागेमुळे रुग्णसेवा देताना अडचणी यायच्या. रिक्त जागांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यातही आला होता. त्याचा पाठपुरावाही केला जात होता. अखेर कामगार आयुक्तांनी स्थानिक स्तरावर विशेषज्ञ भरण्याची परवानगीचे अधिकार दिले. यामुळे रिक्तपदे भरण्यात आली. विशेषज्ञाच्या सेवेमुळे रुग्णसेवेत सुधार होर्ईल.
-डॉ. मीना देशमुख
वैद्यकीय अधीक्षक, कामगार विमा रुग्णालय