शिक्षणमंत्र्यांकडून संघप्रणीत शाळांना विशेष वागणूक
By admin | Published: February 9, 2016 02:55 AM2016-02-09T02:55:01+5:302016-02-09T02:55:01+5:30
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी संघभूमीत दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाळांना त्यांच्याकडून विशेष वागणूक देण्यात आल्याचे दिसून आले.
संस्था प्रतिनिधींची घेतली वेगळी बैठक : प्रतिक्रिया देताना, ‘नरो वा कुंजरो वा’
नागपूर : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी संघभूमीत दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाळांना त्यांच्याकडून विशेष वागणूक देण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी संघप्रणीत शाळांची विशेष बैठक घेतली. आणि विशेष म्हणजे या बैठकीबाबत विचारणा केली असता स्पष्टवक्तेपणा बाजूला सारून त्यांनी चक्क ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतली. तावडे यांनी केवळ संघाशी संबंधित शाळांची बैठक घेतल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोमवारी शिक्षणमंत्री तावडे विविध कार्यक्रमांसाठी नागपुरात आले होते. त्यांंच्या दौऱ्यात दुपारी १२ वाजता संघाशी संबंधित शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी संवादासाठी वेळ राखीव असल्याचे नमूद होते. त्यानुसार त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यात शाळांच्या समस्या, पुढील दिशा, शासनाकडून अपेक्षा इत्यादी बाबी त्यांनी जाणून घेतल्या. परंतु यासंदर्भात ज्यावेळी तावडे यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा चक्क अशी बैठकच झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. ज्यावेळी त्यांना शासकीय दौऱ्याच्या पत्रकाबाबत सांगण्यात आले, तेव्हा कुठे त्यांनी अशी बैठक झाल्याचे मान्य केले.
केवळ संघपरिवारातील शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींसोबतच चर्चा करण्याचे प्रयोजन का, याबाबत त्यांना विचारणा केली असता ते कुठलेही ठोस उत्तर देऊ शकले नाही. यापूर्वी अशाच प्रकारे अल्पसंख्यक शाळांची बैठक बोलविली असल्याचे उत्तर देत त्यांनी मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
एरवी तावडे हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जातात. अगदी विधिमंडळाच्या सभागृहातदेखील याचे अनेकदा दर्शन झाले आहे. अशास्थितीत संघभूमीत संघाशीच जुळलेल्या संस्थांची वेगळी बैठक घेण्याचे कारण का, याबाबत त्यांनी साधलेल्या मौनामुळे प्रश्नांमध्ये आणखी वाढच झाली आहे.(प्रतिनिधी)
इतर शाळांचे काय?
राज्याप्रमाणेच नागपूर विभागातील शाळांचेदेखील विविध प्रश्न व अडचणी आहेत. शासनासाठी सर्वच शाळा समान असणे अपेक्षित आहे. परंतु केवळ संघप्रणीत शाळांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून इतर शाळांकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे; तसेच शिक्षण प्रणालीत बदलाचे वारे वाहत असताना पुरोगामी महाराष्ट्रात शाळांना विचारसरणीप्रमाणे महत्त्व मिळणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या माध्यमातून संघाच्या पदाधिकाऱ्यांना समाधानी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू होती.