Corona Virus in Nagpur; मध्य नागपुरातील अनेक वस्त्या सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 09:13 PM2020-04-05T21:13:04+5:302020-04-05T21:15:00+5:30
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्याने मध्य नागपुरातील मोठा परिसर सील करण्यात आला आहे. लोकांची ये-जा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांसह १५० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्याने मध्य नागपुरातील मोठा परिसर सील करण्यात आला आहे. लोकांची ये-जा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांसह १५० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहे. झोन तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या परिसरात रुट मार्च करीत आहे.
मध्य नागपुरातील तकिया परिसरात राहणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्याचा उपचार सुरु आहे. ही व्यक्ती व्यवसायानिमित्त दिल्लीत गेली होती. १५ मार्च रोजी ती नागपूरला परतली. ती शनिवारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यानंतर पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले. शनिवारी रात्री मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तकिया परिसरातील अनेक वस्त्या सील करण्याचे आदेश जारी केले. यानंतर पोलिसांनी मोर्चा सांभाळला आहे. मोमीनपुरा चौक ते टीमकी तीन खंबा चौक आणि भगवाघर चौक ते नालसाब चौक दरम्यानचा परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात दाट लोकवस्ती आहे. येथे हजारो लोक राहतात. या परिसरातील दाट लोकसंख्या आणि कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती उशिरा आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या परिसरातील मुख्य चौक आणि गल्लीबोळातील रस्त्यांवरही बॅरिकेड्स लावून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.
सील करण्यात आलेल्या परिसरात अधिकाऱ्यांसह १५० वर अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी एसआरपीचे दोन सेक्शन आणि आरसीबी सुद्धा तैनात करण्यात आले आहे. झोन तीनचे डीसीपी राहुल माकणिकर शनिवारी दुपारपासूनच बंदोबस्ताचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात शनिवारी मोमीनपुरा आणि रविवारी टेका नाका परिसरात रुट मार्च करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे निर्देश देत सहकार्य करण्याचे आवाहनही करीत आहेत.
बंदीतून वगळण्यात आलेल्या बाबी
या परिसरातील सर्व रस्ते सील करण्यात आले असून रहदारीही बंद करण्यात आली आहे. परंतु या बंदीत नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष काळजी घेत या बंदीतून काही बाबी वगळल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचारी व अधिकारी
आवश्यक तातडीची वैद्यकीय सेवा तसेच अंत्यविधी.
वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथालॉजिस्ट इत्यादी.
जीवनावश्यक वस्तूंचा सेवा पुरवठा करणारे व्यक्ती (पोलीस विभागामार्फत पास प्राप्त धारक)
शहर पोलिसांच्या सेवेला सलाम
पोलीस आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करीत आहेत. सुरक्षा व्यवस्थेसोबतच ते लोकांना भोजन आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही करीत आहेत. कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करीत त्यांचा आत्मविश्वासही वाढवित आहेत. शनिवारी सुद्धा मुसळधार पावसातही पोलिसांनी रुट मार्च केला. पोलिसांच्या या सेवेला प्रत्येक नागरिक सलाम करीत आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे म्हणणे आहे की, कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच नागरिकांची सेवा करणेही पोलिसांचे कर्तव्य आहे. शहरातील प्रत्येक नागरिक त्यांचे कुटुंबीय आहे. नागरिकांनी प्रत्येक वेळेस पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यामुळे आताही तशाच सहकार्याची गरज असून नागरिकांनी आपापल्या घरीच राहून सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी केले आहे.