नागपुरात वेगाने केला घात : अभियंत्यासह पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:33 AM2018-10-31T00:33:34+5:302018-10-31T00:34:12+5:30

शहर आणि शहराबाहेरच्या भागात गेल्या २४ तासात झालेल्या वेगवेगळ्या भीषण अपघातात पाच जणांचा करुण अंत झाला. ठार झालेल्यांमध्ये कन्हानमधील एका अभियंत्याचाही समावेश आहे. वेगात वाहने चालविल्यामुळे हिंगणा, सक्करदरा, बेलतरोडी आणि कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले.

Speed become fatal in Nagpur: Engineers including five killed | नागपुरात वेगाने केला घात : अभियंत्यासह पाच जणांचा मृत्यू

नागपुरात वेगाने केला घात : अभियंत्यासह पाच जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे२४ तासात चार अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर आणि शहराबाहेरच्या भागात गेल्या २४ तासात झालेल्या वेगवेगळ्या भीषण अपघातात पाच जणांचा करुण अंत झाला. ठार झालेल्यांमध्ये कन्हानमधील एका अभियंत्याचाही समावेश आहे. वेगात वाहने चालविल्यामुळे हिंगणा, सक्करदरा, बेलतरोडी आणि कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले.
पहिला अपघात सोमवारी रात्री १० च्या सुमारास वर्धा मार्गावरील जामठ्याजवळ घडला. अयोध्यानगरातील रहिवासी विजय सुखदेवराव जुमडे (वय ४२) हे वॉटर प्रुफिंगचे काम करायचे. त्यांनी हिंगणघाटमध्ये काम घेतले होते. काम आटोपल्यानंतर सोमवारी रात्री ते त्यांच्या कारमधून नागपूरला परत येत होते. कारमध्ये त्यांच्यासोबत निशांत नानाजी कुबडे (वय ४०, रा. संत्रा मार्केट), राजेंद्र गणपतराव अलोणे (वय ४०) आणि नौशाद इस्माइल खान (वय ३४, रा. जगदीश नगर) होते. जामठा परिसरात अनियंत्रित कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. त्यामुळे चारही जण गंभीर जखमी झाले. या मार्गाने जाणाऱ्यांनी हिंगणा पोलिसांना माहिती कळवून जखमींना मदतीचा हात देत कारबाहेर काढले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी विजय जुमडे तसेच राजेंद्र अलोणे यांना मृत घोषित केले. निशांत आणि नौशादची प्रकृती गंभीर आहे. दुसरा अपघात सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री झाला. पराग गोपाल शेंद्रे (वय २८) या तरुणाचा अनियंत्रित दुचाकीवरून पडून करुण अंत झाला.
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री तिसरा अपघात झाला. मदन मांझी (वय ३०) हा तरुण सोमवारी रात्री रस्त्याने पायी जात असताना एका भरधाव वाहनाने त्याला चिरडले. हा प्रकार मंगळवारी सकाळी लक्षात आल्यानंतर बेलतरोडी पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस दोषी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.
चौथा अपघात कामठी मार्गावर मंगळवारी दुपारी झाला. अभियंता असलेला अश्विनकुमार गौतम वानखेडे (वय २३, रा. रामनगर, कन्हान) हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. तो त्यासाठी नागपुरात शिकवणी वर्गाला येत होता. मंगळवारी दुपारी क्लास आटोपल्यानंतर तो कन्हानकडे निघाला. सिमेंटची पोती भरून आलेल्या ट्रकने कामठीतील ड्रॅगन पॅलेसजवळ वानखेडेच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला कामठीतील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातामुळे कामठी मार्गावर काही वेळेसाठी प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

 

Web Title: Speed become fatal in Nagpur: Engineers including five killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.