सदर उड्डाण पुलाची गती संथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:26 AM2017-10-25T01:26:11+5:302017-10-25T01:26:26+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचए) नासुप्र ते पागलखाना चौक व छावणी पर्यंत उभारण्यात येणाºया उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे.
बांधकामामुळे रस्ता अरुंद
कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचए) नासुप्र ते पागलखाना चौक व छावणी पर्यंत उभारण्यात येणाºया उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. शिवाय पुलाचे काम करीत असताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजण्यात आलेले नाही. बांधकामासाठी रस्त्याच्या मधोमध टीन शेड लावून दोन्ही बाजूने जागा राखीव करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे रस्ते अरुंद झालेले आहेत. बांधकामामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकीस्वारांचे तोल जाऊन अपघात होत आहे. असे असतानाही ‘एनएचए’ ने संबंधित खड्डे भरण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या दुर्लक्षामुळे प्रसंगी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नासुप्रच्या समोरून हा उड्डाणपूल सुरू होईल. सदर मुख्य रस्ता मार्गे राजभवनच्या समोरील चौकापर्यंत एकच पूल असेल. या पॉर्इंटपासून पुढे ‘वाय शेप’मध्ये दोन दिशेने दोन पूल जातील. एक पूल छिदवाडा रोडवर पागलखाना चौकाच्या पुढे उतरेल तर दुसरा पूल काटोल रोडवर छावणी माता मंदिराच्या समोर उतरेल. सहा महिन्यापूर्वी या पुलाच्या बांधकामासाठी मातीपरीक्षण करण्यात आले. चार महिन्यांपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. पागलखाना चौकापासून पुढे असलेल्या भागात काही पिलर उभारले गेले आहेत. मात्र, पागलखाना चौक ते छावणी चौकापर्यंत सुरू असलेल्या बांधकामामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. बांधकामामुळे दोन्ही बाजूला अरुंद रस्ता उरला आहे. शिवाय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर पाणी साचलेले असते. यामुळे दुचाकी घसरण्याचा धोका आहे. यामुळे येथून सुलभतेने वाहने चालविण्यात अडचणी येत आहे. यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे.
शहरात मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. पिलर उभारले जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या मधील जागा दोन्ही बाजूंनी टीन शेड लावून सुरक्षित करण्यात आली आहे. वाहने जाण्यासाठी उरलेल्या रस्त्यावर खड्डे पडले असतील तर आवश्यक तेथे डांबरीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी तर रस्त्याच्या बाजूचीही जागा समतल करण्यात आली आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे कुठेही वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून चौकाचौकात सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या नासुप्र व ते पागलखाना चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाच्या बांधकामात अशी कुठलीच खबरदारी घेण्यात आलेली नाही.