‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’ला ‘स्पीड अप’ करा; मुख्यमंत्री, गडकरी यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:19 AM2018-08-27T10:19:04+5:302018-08-27T10:19:38+5:30
उपराजधानीतील ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’चा प्रकल्प जागतिक दर्जाचा करण्याच्या दृष्टीने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’चा प्रकल्प जागतिक दर्जाचा करण्याच्या दृष्टीने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रशासकीय प्रक्रियेला वेग आणा व आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प स्वयंपूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना या दोन्ही नेत्यांनी रविवारी केली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’ येथे नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्याची सूचना करण्यात आली.
या बैठकीत ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’च्या प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. हा प्रकल्प महानगरपालिकेच्या मालकीच्या ३०.४९ हेक्टरवर राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत हॉस्पिटल, मेडिकल हब, सराफा व्यवसाय आदी वाणिज्यिक वापरासोबतच रहिवासी तसेच मनोरंजन आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाला अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून याचा आराखडा लवकरात लवकर तयार करावा तसेच या प्रकल्पासाठी महानगरपालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यास व मेट्रो यांची संयुक्त बैठक घेऊन आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प स्वयंपूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे. सोबतच एकत्रित प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी तात्काळ सादर करुन या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकर कसे करता येईल या दिशेने प्रयत्न करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री व गडकरी यांनी केल्या. यावेळी ‘मिहान’ येथील ‘कन्व्हेन्शन सेंटर’, ‘ग्रो व्हिजन कन्व्हेन्शन सेंटर’ यांच्यासह यशवंत स्टेडियम, संत्रा, कॉटन मार्केट तसेच अंबाझरी ओपन थिएटरसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या प्रकल्पांचे प्रस्ताव कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण करण्याच्या सूचनादेखील दोन्ही नेत्यांनी केल्या.
‘इलेक्ट्रिक बस’च्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता
बस वाहतूक अत्यंत सुलभ व कमी खर्चात तसेच नागरिकांनाही सुलभपणे प्रवास करता येईल यादृष्टीने ‘इलेक्ट्रिक बस’च्या प्रस्तावास बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. ‘ओलेक्ट्रा ग्रीन टेक लिमिटेड’तर्फे या बसचे सादरीकरण करण्यात आले. ‘इलेक्ट्रिक बस’ वातानुकूलित असून भाडेसुद्धा कमी राहणार असल्यामुळे बस चालविण्यासंदर्भात संबंधित कंपनीने सकारात्मक व योग्य दराचा प्रस्ताव सादर केल्यास राज्यात ‘इलेक्ट्रिक बस’ चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
फुटाळ्यासाठी ११२ कोटींचा निधी
फुटाळा तलाव परिसराचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे तळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. येथे चार ते पाच हजार प्रेक्षक बसू शकतील अशा प्रकारची ‘लेक व्ह्यू गॅलरी’, ‘शॉपिंग एरिया’, वाहनतळासाठी संपूर्ण व्यवस्था यादृष्टीने नियोजन व्हावे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनातर्फे ११२ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
दहा हजार क्षमतेचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’
‘मिहान’मध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक ‘कन्व्हेन्शन सेंटर’ प्रस्तावित असून याची क्षमता दहा हजार व्यक्तींची राहणार आहे. हे ‘सेंटर’ देशविदेशातील उद्योजक, नागरिक, खेळाडू आदींचे आकर्षण ठरेल यादृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ‘कन्व्हेन्शन सेंटर’ साठी आवश्यक ते संपूर्ण साहाय्य केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येईल. यासाठी ‘ट्रायकॉन’तर्फे सुंदर व आकर्षक आराखडे तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.