‘आॅनलाईन’च्या युगात ‘स्पीड पोस्ट’ वेगात
By admin | Published: July 25, 2016 02:31 AM2016-07-25T02:31:11+5:302016-07-25T02:31:11+5:30
तंत्रज्ञानाचा झालेला विकास व खासगी कंपन्यांचा शिरकाव यामुळे टपाल खात्याच्या ‘स्पीड पोस्ट’ प्रणालीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे
१४ महिन्यांत ५ कोटींची कमाई : टपाल खात्याच्या एकूण महसुलाचा आकडा ५७ कोटींहून अधिक
नागपूर : तंत्रज्ञानाचा झालेला विकास व खासगी कंपन्यांचा शिरकाव यामुळे टपाल खात्याच्या ‘स्पीड पोस्ट’ प्रणालीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु प्रत्यक्षात ‘आॅनलाईन’च्या युगातदेखील ‘स्पीड पोस्ट’ची मागणी कायम आहे. नागपूर शहरात १४ महिन्यांच्या कालावधीत टपाल खात्याला ‘स्पीड पोस्ट’पासून पाच कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर शहरात टपाल खात्याला मिळत असलेल्या महसुलासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती.
‘स्पीड पोस्ट’पासून किती महसूल प्राप्त होतो, टपाल खात्याच्या विविध सेवा तसेच योजनांपासून किती निधी मिळतो, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.
प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘स्पीड पोस्ट’ हे ‘बीडी’ उत्पादनांतर्गत (बिझनेस डेव्हलपमेंट) येते. १ एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१६ या १४ महिन्यांच्या कालावधीत टपाल खात्याला ‘स्पीड पोस्ट’पासून ५ कोटी ३० लाख ९ हजार ६८७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
या कालावधीत नागपूर शहरात टपाल खात्याला एकूण ५७ कोटी ५० लाख ३५ हजार १५६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यात ‘बीडी’ उत्पादनांपासून ७ कोटी ३९ लाख ५८ हजार ६८४ रुपये तर ‘नॉन बीडी’ उत्पादनांपासून १० कोटी ७० लाख रुपये प्राप्त झाले. (प्रतिनिधी)
टपाल आयुर्विम्यापासून सर्वाधिक महसूल
टपाल खात्यातर्फे आयुर्विमादेखील काढण्यात येतो व याला ‘पीएलआय’ (पोस्टल लाईफ इन्शुरन्स) असे म्हणतात. १४ महिन्यांत नागपूर शहरात टपाल खात्याला सर्वाधिक महसूल ‘पीएलआय’पासून प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेल्या महसुलाची आकडेवारी २३ कोटी ११ लाख इतकी आहे, तर ‘आरपीएलआय’पासून (रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स) ६० लाख रुपये प्राप्त झाले.