मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 10:07 AM2018-04-23T10:07:50+5:302018-04-23T10:08:00+5:30
मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाची गती इतकी संथ आहे की, ४६ योजनांचा आराखडा तयार झाल्यानंतरही २०१८-१९ या वर्षात केवळ २८ योजनांचे कार्यारंभ आदेश मिळू शकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीव्र पाणीटंचाई भेडसावत असलेल्या गावांसाठी गेल्या दोन वर्षापासून मुख्यमंत्री पेयजल योजना अमलात आणली. परंतु या योजनेच्या कामाची गती इतकी संथ आहे की, ४६ योजनांचा आराखडा तयार झाल्यानंतरही २०१८-१९ या वर्षात केवळ २८ योजनांचे कार्यारंभ आदेश मिळू शकले.
राष्ट्रीय पेयजल योजनेमधील प्रकल्प राबविताना केंद्राचा निधी उशिरा मिळत असल्याने कामांना ब्रेक लागायचा़ त्यामुळे राज्य शासनाने आपल्या हक्काच्या निधीचा वापर करीत मुख्यमंत्री पेयजल योजना अमलात आणली़ परंतु दोन वर्षांपासून ही योजना कागदावरून पुढे सरकायचे नाव घेत नाही़
त्यामुळे या योजनेची कमालीची कासवगती असल्याचे पहायला मिळते आहे़ २०१५-१६ या वर्षात ही योजना लागू करण्यात आली़ सुरुवातीच्या वर्षात तीव्र टंचाईयुक्त गावांची यादी तयार करून ती शासनाच्या पाणीपुरवठा खात्याला सादर करण्यात आली़ अंदाजपत्रकीय मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झालेत़ परंतु काही ग्रामपंचायतने ही योजना राबविण्यासाठी नकार दिल्याने ग्रामपंचायत ठरावच पाणीपुरवठा विभागाला अप्राप्त होते़ त्यामुळे २०१६-१७ हे वर्ष नुसते या योजनांचा आढावा आणि कागदी दस्ताऐवजांचा पाठपुरावा करण्यात गेले़
२०१७-१८ या वर्षात ४६ पैकी ४१ योजनांना तांत्रिक मंजुरी शासनाकडून मिळाली व २८ योजनांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले़ परंतु अद्यापही प्रत्यक्षात काम सुरू करावयास अडथळे आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाच्या मदतीने ही योजना राबविण्यात येत आहे़ टप्पा क्रमांक १ मध्ये २१ योजना, टप्पा २ मध्ये ६ तर टप्पा क्रमांक ३ मध्ये १ योजना मार्गी लागणार आहे़ परंतु प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त या उन्हाळ्यात तरी होईल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे़
या योजना टप्पानिहाय सुरू आहे़ तांत्रिक मान्यता जसजशी मिळत आहे़ तशा या योजनेतील कामे मार्गी लागत आहे़ संपूर्ण कामे करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन असल्याचे जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी सांगितले.