टेकडी गणेश मंदिराच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:16+5:302021-02-06T04:16:16+5:30
धीरज शुक्ला नागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. लॉकडाऊनमुळे काम रखडले होते. ...
धीरज शुक्ला
नागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. लॉकडाऊनमुळे काम रखडले होते. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून कामाने गती पकडली आहे. मंदिराचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती मंदिराचे सचिव संजय जोगळेकर यांनी दिली.
एकूण बांधकाम ८ हजार चौरस फूट जागेवर होत आहे. त्यावर एकूण ३.५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. मंदिराची पायाभूत कामे पूर्ण झाली आहेत. सध्या मंदिराला अंतिम स्वरूप देण्याची कामे सुरू आहेत. कंत्राटदाराला भाविकांच्या देणगीतून पैसे दिले जात आहेत. अग्निशमन सुविधेचे काम पूर्ण झाले आहे.
----
मनपाने दिले ८० लाख रुपये
मंदिराच्या कामासाठी महानगरपालिकेने ८० लाख रुपये दिले आहेत. त्यात मंदिराचे ४० लाख रुपये टाकून सौंदर्यीकरण व भाविकांसाठी आवश्यक सुविधांची कामे केली जाणार आहेत. पार्किंगकरिता पुरेशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
----------
सिंहासनाचा प्रस्ताव प्रलंबित
गणेशजीकरिता ५१ किलो सोन्याचे सिंहासन तयार करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सुरक्षेची आवश्यक तयारी केल्यानंतरच या प्रस्तावावर निर्णय घेण्याचा ट्रस्टचा विचार आहे. परंतु, मंदिराच्या गर्भगृहातील छताला चांदीचे वर्क करण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, मंदिराला सेनेद्वारे ४ कोटी रुपयांमध्ये ४ एकर जमीन दिली जाऊ शकते.