जीवघेणे अपघात रोखण्यासाठी नागपुरात आता ‘स्पीडगन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:40 AM2018-02-16T11:40:15+5:302018-02-16T11:42:33+5:30
बेदरकारणपणे वाहन चालवून अपघात घडवून आणणाऱ्यांना आवरण्यासाठी स्पीडगनचा वापर करण्यात येईल. शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेदरकारणपणे वाहन चालवून अपघात घडवून आणणाऱ्यांना आवरण्यासाठी जास्तीत जास्त स्पीडगनचा वापर करण्यात येईल. त्या माध्यमातून जीवघेणे अपघात थांबण्यासोबतच शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारला. शहराला अपघातमुक्त कसे करता येईल आणि बेशिस्त वाहनचालकांना कसे वठणीवर आणता येईल, या संबंधाने त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी चर्चा केली. ज्या भागात जास्त गंभीर अपघात होतात. असे ठिकाणं ब्लॅक स्पॉट म्हणून आम्ही अधोरेखित केले आहेत. अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी प्रभावी उपाययोजना केल्या जात आहे, असे ते म्हणाले.
उपराजधानीतील वाहतूक व्यवस्था वळणदार बनविण्यासाठी वर्षभरापूर्वी वाहतूक पोलिसांनी एन ट्रॅक्स (नागपूर ट्रॅफिक क्लब) ची निर्मिती केली. यात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील ३० ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक ग्रुप बनविला. या व्हॉटस्अॅप ग्रुपचा क्रमांक ९०११३८७१०० आहे. या क्रमांकावर आपले नाव, पत्ता पाठवून कोणताही नागरिक ट्रॅफिक क्लबचा सदस्य होऊ शकतो. जुलै २०१७ पासून या क्लबचे एकूण १५७५ सदस्य झाले. त्यांच्यापैकी अनेक सदस्यांनी उपराजधानीतील विविध भागात वाहनचालकांकडून वाहतूक नियमाचे केले जाणारे उल्लंघन आणि तशाच संबंधित एकूण ६०३ तक्रारी पाठवल्या. त्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचेही उपायुक्त चैतन्य यांनी सांगितले. मेट्रो आणि सिमेंट रोड बांधकामामुळे वाहतुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतूक, मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि अशाच प्रकारच्या अनेक समस्या आहेत. त्यावर प्रभावीपणे उपाय केले जातील, असे ते म्हणाले.
मेट्रोने केले ४२ सिग्नल बंद
मेट्रोच्या कामामुळे शहरातील ४२ सिग्नल बंद स्थितीत आहेत. पार्किंगचीही जागोजागी समस्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रशासनाशी चर्चा सुरू आहे, असे उपायुक्त चैतन्य म्हणाले. शहराला अपघातमुक्त करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी एनट्रॅक्सचे सदस्य व्हावे. सदस्य झालेली मंडळी आपल्या मोबाईलवरून कोणत्याही भागातील वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो आम्हाला पाठवू शकतात. आम्ही त्यावर तातडीने कारवाई करू, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
घेणे-देणे सहन करणार नाही
वाहतूक शाखा पोलिसांची कार्यपद्धती आणि लाचखोरीवर पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. अवैध प्रवासी वाहतुकीचाही प्रश्न उपस्थित झाला. त्यासंबंधाने बोलताना कोणतेही लागेबांधे सहन केले जाणार नाही. भ्रष्टाचार संपवण्यासाठी कॅशलेस चालानचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचेही उपायुक्त चैतन्य म्हणाले.