सुसाट कारने दाम्पत्याला उडविले; पत्नीचा मृत्यू, पतीसह मुलगा व मुलगी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 11:21 AM2022-08-25T11:21:02+5:302022-08-25T11:25:07+5:30
या धडकेमुळे माेटारसायकल कार व पुलाच्या संरक्षक कठड्याच्या मध्ये दबली गेली.
माैदा (नागपूर) : दाम्पत्याच्या माेटारसायकलला मागून वेगात आलेल्या कारने जाेरात धडक दिली. त्यामुळे माेटारसायकल पुलाचा संरक्षक कठडा आणि कार यांच्यात दबली गेली. यात दुचाकीवरील पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पती, मुलगा व मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माैदा-नागपूर महामार्गावरील माथनी शिवारातील कन्हान नदीच्या पुलावर बुधवारी (दि. २४) सायंकाळी घडली.
भारती राजू तिजारे (३५) असे मृत पत्नीचे नाव असून, जखमींमध्ये पती राजू कृष्णराव तिजारे (४०), मुलगा कृष्णराज राजू तिजारे (१२) व मुलगी सिद्धेश्वरी राजू तिजारे (८) या तिघांचा समावेश आहे. तिजारे कुटुंबीय चिरव्हा (ता. माैदा) येथील रहिवासी आहेत. राजू तिजारे त्यांची पत्नी व दाेन मुलांसाेबत त्यांच्या दुचाकीने (क्र. एमएच ४० एएम २६९३) नागपूरहून माैदामार्गे चिरव्हा येथे जात हाेते. ते माथनी (ता. माैदा) शिवारातील कन्हान नदीच्या पुलावर पाेहाेचले असता नागपूरहून भंडाराच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या कारने (क्र. एमएच ३५ एजी ९१६०) त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली.
या धडकेमुळे माेटारसायकल कार व पुलाच्या संरक्षक कठड्याच्या मध्ये दबली गेली. यात चाैघेही गंभीर जखमी झाले. भारती तिजारे यांचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी तिन्ही जखमींना माैदा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर राजू व कृष्णराज यांना नागपूर, तर सिद्धेश्वरीला भंडारा शहरातील हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था करण्यात आली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.