नागपुरात भरधाव बसची स्कूल बसला धडक : भीषण अपघात टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 08:32 PM2020-03-12T20:32:31+5:302020-03-12T20:33:32+5:30
सिग्नलकडे दुर्लक्ष करून वर्दळीच्या चौकातून भरधाव बस दामटणाऱ्या एका प्रवासी बसने स्कूल बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे स्कूल बस उलटली आणि चालक जबर जखमी झाला. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिग्नलकडे दुर्लक्ष करून वर्दळीच्या चौकातून भरधाव बस दामटणाऱ्या एका प्रवासी बसने स्कूल बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे स्कूल बस उलटली आणि चालक जबर जखमी झाला. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नव्हते. त्यामुळे भीषण अपघात टळला. गुरुवारी सकाळी ६.१५ ला वर्धा मार्गावरील छत्रपती चौकाजवळ हा अपघात घडला. अपघातानंतर आरोपी बसचालक पळून गेला.
स्कूल ऑफ स्कॉलरची बस (एमएच ४०/ एन ६७४७) ही गुरुवारी सकाळी ६.१५ वाजता खामल्याकडून नरेंद्रनगरकडे जात होती. छत्रपती चौकात बस आली असता, वेगात आलेल्या एका खासगी प्रवासी बसच्या (एमएच ४०/ एटी ०१६९) चालकाने स्कूल बसला जोरदार धडक मारली. धडक मारणाºया बसचा वेग एवढा जास्त होता की स्कूल बस अक्षरश: उलटी झाली. भल्या सकाळची वेळ असल्याने या मार्गावर वाहनांची किंवा नागरिकांची वर्दळ नव्हती. त्यात स्कूल बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता. त्यामुळे भीषण अपघात टळला. स्कूल बसचे चालक कमलाकर आनंदराव काळबांडे (वय २८, रा. नरखेड) यांना जबर दुखापत झाली. अपघाताची माहिती कळाल्यानंतर पीएसआय मंगेश गोळे आणि धंतोलीचे पोलीस तेथे पोहचले. वाहतूक शाखेचेही पोलीस पोहचले. क्रेनच्या सहाय्याने बस सरळ करून या मार्गावर वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात आला.
या अपघातानंतर आरोपी चालक बस(ट्रॅव्हल्स)सह पळून गेला. काळबांडे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.