भरधाव कारच्या धडकेत चितळ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 07:43 PM2019-08-26T19:43:53+5:302019-08-26T19:45:19+5:30
वेगात जात असलेल्या कारने रोड ओलांडणाऱ्या चितळाला जोरदार धडक दिली. त्यात त्या चितळाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (देवलापार) : वेगात जात असलेल्या कारने रोड ओलांडणाऱ्या चितळाला जोरदार धडक दिली. त्यात त्या चितळाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्ग क्रमांक - ७ वर सोमवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली.
हा महामार्ग पेंच व्याघ्र प्रकल्प आणि मानसिंगदेव अभयारण्यातून गेला असून, या घनदाट जंगलाचा काही भाग प्रादेशिक वन विभागात येतो. या जंगलात वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. चौपदरी असलेल्या या महामार्गावर अंदाजे तीन फूट उंचीचे टिनपत्र्यांचे दुभाजक लावले आहेत. दरम्यान, प्रादेशिकच्या देवलापार वन परिक्षेत्रात सदर चितळ महामार्ग ओलांडत होते.
त्यातच शिवनी (मध्य प्रदेश) येथून देवलापार मार्गे नागपूरच्या दिशेने वेगात जात असलेल्या एमपी-२२/सीए-४५०१ क्रमांकाच्या त्या चितळाला जोरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय, कारचालक आशिषकुमार सूर्यवंशी रा. सुकतरा (मोहगाव), जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले. वृत्त लिहिस्तो या प्रकरणी पोलिसात गुन्ह्यांनी नोंद करण्यात आली नव्हती.