भरधाव कंटेनरची एसटीला धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 02:51 PM2022-11-22T14:51:06+5:302022-11-22T14:52:14+5:30
खिंडसी जलाशयाजवळील अपघात
रामटेक (नागपूर) : भरधाव कंटेनरने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एसटीला धडक दिली. हा कंटेनर बसच्या एका बाजूला घासत गेला. यात एका विद्यार्थिनीला किरकाेळ दुखापत झाली, बसच्या काचा फुटल्या. शिवाय, बसमधील विद्यार्थ्यांसह इतर प्रवासी थाेडक्यात बचावले. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-तुमसर मार्गावरील खिंडसी जलाशयाजवळच्या वळणावर साेमवारी (दि. २१) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
रामटेक आगाराची एमएच-४०/एक्यू-६२१७ क्रमांकाची रामटेक-आसाेली बस विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आसाेली (ता. रामटेक)च्या दिशेने निघाली. त्या बसमध्ये विद्यार्थ्यांसह काही प्रवासी प्रवास करीत हाेते. ही बस सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास खिंडसी जलाशयाजवळील वळणावर पाेहाेचली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने म्हणजेच तुमसरहून रामटेकच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने बसला कट मारत धडक दिली. हा कंटेनर बसच्या एका बाजूने घासत पुढे गेला.
यात बसचा पत्रा निघाला असून, काचा फुटल्या. शिवाय, एका विद्यार्थिनीला किरकाेळ दुखापत झाल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. तिचे नाव व कंटेनर निघून गेल्या त्याचा क्रमांक मात्र कळू शकला नाही. बसमधील विद्यार्थी व इतर प्रवासी सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात बसचे किमान तीन हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती रामटेकचे आगार व्यवस्थापक भाेगे यांनी दिली असून, यासंदर्भात पाेलिसांत तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.