भरधाव जेसीबीची धडक : दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 08:51 PM2019-06-03T20:51:39+5:302019-06-03T20:52:16+5:30
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री भरधाव जेसीबीने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री भरधाव जेसीबीने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. पृथ्वीराज मनोहर जाधव (वय २१, रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, रघुजीनगर) आणि सुशांत नागदेवते (रा. आदिवासी कॉलनी) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर, गंभीर जखमी झालेल्याचे नाव शुभम गुणवंतराव वाघ (रा. आदिवासी कॉलनी) असे आहे.
जाधव, नागदेवते आणि वाघ हे तिघे रविवारी रामटेककडे गेले होते. रात्री ८.३० च्या सुमारास त्यांच्या दुचाकीने (एमएच ४९/ एएक्स ३२९५) रामटेकवरून नागपुरात परत येत होते. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर मार्गावरील शेंद्रे ढाब्यासमोर चुकीच्या दिशेने वेगात जेसीबी (एमएच ३४/ एल ६६७९) चालविणाऱ्याने दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे पृथ्वीराज आणि सुशांतचा करुण अंत झाला तर शुभम गंभीर जखमी झाला. शिवराज रणजीत जाधव (वय २४, रा. वकीलपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.