नागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात भरधाव स्कॉर्पिओ उलटली, चार गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 08:06 PM2018-08-21T20:06:58+5:302018-08-21T20:10:16+5:30
भिवापूर भागात चामोर्शीवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील स्कार्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक देत उलटली. यात स्कॉर्पिओमधील सहापैकी चार जण गंभीर जखमी झाले. या धडकेत पुलावरील कठडे तुटले मात्र सुदैवाने अपघातग्रस्त वाहन ८० फूट खोल नदीपात्रात न पडल्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भिवापूर भागात चामोर्शीवरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील स्कार्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक देत उलटली. यात स्कॉर्पिओमधील सहापैकी चार जण गंभीर जखमी झाले. या धडकेत पुलावरील कठडे तुटले मात्र सुदैवाने अपघातग्रस्त वाहन ८० फूट खोल नदीपात्रात न पडल्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली.
राहुल श्रावण गोलाईत (२७) रा. चामोर्शी, गीतेश धर्माजी बारसागडे (२४) रा. कुरुड चामोर्शी, संदीप रघुनाथ गोलाईत (२४) रा. गोंडपिपरी, अक्षय बाबूराव पिपरे (२४) रा. चामोर्शी अशी अपघातातील जखमींची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार स्कार्पिओ क्र. एम. एच. ३० ए.ए. ३७७७ हे वाहन चामोर्शी येथून भरधाव वेगात नागपूरकडे जात होते. दरम्यान राष्ट्रीय मार्गावरील भिवापूर लगतच्या मरुनदी वळण रस्त्यावर चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहनाने पुलाच्या कठड्याला धडक दिली. नंतर हे वाहन पुलावरच उलटले. माहिती मिळताचं ठाणेदार हर्षल अेकरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक ग्रामीण रूग्णालयात व प्राथमिक उपचारानंतर नागपूरला हलविले. वाहन उलटल्यामुळे राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. ठाणेदार हर्षल अेकरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास एएसआय दौलत नैताम करीत आहे.
तो ८० फूट खोल पात्रात पडला!
वाहनाने पुलावरील कठड्याला धडक दिल्यानंतर वाहनातील सहा जणांपैकी एक १८ वर्षाचा तरुण मुलगा थेट ८० फूट नदीपात्रात फेकला गेला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने तो बचावला. पात्रात फेकल्या गेल्यानंतर हा जिगरबाज तरुण नदीच्या पाण्यातून पोहत पोहत बाहेर पडला. त्याला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नसली तरी मानसिक धक्का मात्र बसल्याचे जाणवत होते.