नागपूर जिल्ह्यात भरधाव तवेरा उलटली : दोघांचा मृत्यू, सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:15 AM2019-12-01T00:15:19+5:302019-12-01T00:16:40+5:30

वेगात असलेल्या तवेरावरील चालकाचा ताबा अचानक सुटला आणि ती दुभाजकावर आदळून उलटली. एवढेच नव्हे तर ती तवेरा चार कोलांट्या घेत रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन स्थिरावली. यात दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला

Speedy Tavera overturned in Nagpur district: two killed, seven injured | नागपूर जिल्ह्यात भरधाव तवेरा उलटली : दोघांचा मृत्यू, सात जखमी

नागपूर जिल्ह्यात भरधाव तवेरा उलटली : दोघांचा मृत्यू, सात जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देसावनेर - पांढुर्णा महामार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर/केळवद) : वेगात असलेल्या तवेरावरील चालकाचा ताबा अचानक सुटला आणि ती दुभाजकावर आदळून उलटली. एवढेच नव्हे तर ती तवेरा चार कोलांट्या घेत रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन स्थिरावली. यात दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, अन्य सात कामगार गंभीर जखमी झाले. त्यातील दोघे अत्यवस्थ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ही घटना सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रापूर शिवारात शनिवारी दुपारी २.४० वाजताच्या सुमारास घडली.
मारोतराव परयाम (४२) व विनोद राऊत (२३) दोघेही रा. अंबाडा (खुर्द), ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये गंभीर जखमी सोमखलाल खंडाते (३०), दुर्गादास उईके (३०), वीरेंद्र मालकाम (२३), पुंडलिक कुंभरे (२८), रामनाथ खंडारे (२५), दिनेश खंडारे (३५) व अंबादास उईके (४०) सर्व रा. अंबाडा (खुर्द), ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा यांचा समावेश आहे.
सावनेर तालुक्यात कापसाचे काही खासगी जिनिंग आहेत. त्यातील एका जिनिंगमध्ये कामगारांची आवश्यकता असल्याने विजय वंजारी, रा. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा हे या सर्व कामगारांना एमएच-२३/वाय-०८२४ क्रमांकाच्या तवेराने पांढुर्णा येथून सावनेरला आणत होते. सुसाट वेगात असलेली ही तवेरा छत्रापूर शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर धडकली व उलटली. या तवेराने चार कोलांट्याही घेतल्या.
यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य सात जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारार्थ तसेच दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. जखमींवर प्रथमोपचार केल्यानंतर सर्वांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वैद्य यांनी दिली.
या कामगारांसंदर्भात तालुक्यातील सर्व जिनिंगमध्ये संपर्क साधून विचारणा केली असता, कुणीही सदर कर्मचारी आपल्या जिनिंगमध्ये कामाला येत असल्याचे सांगितले नाही. अपघातामुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचेही काहींनी सांगितले. याप्रकरणी केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास ठाणेदार सुरेश मट्टामी करीत आहेत.

 

 

Web Title: Speedy Tavera overturned in Nagpur district: two killed, seven injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.