जैन भाविकांच्या प्रवासी बसला ट्रकची धडक : एका महिलेचा मृत्यू, १३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 08:09 PM2019-07-12T20:09:58+5:302019-07-12T22:55:35+5:30
धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या जैन भाविकांच्या प्रवासी बसला ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून जोरदार धडक मारली. यामुळे बसमधील एक महिला भाविक ठार झाली तर, १३ प्रवासी भाविक जखमी झाले. त्यातील सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या जैन भाविकांच्या प्रवासी बसला ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून जोरदार धडक मारली. यामुळे बसमधील एक महिला भाविक ठार झाली तर, १३ प्रवासी भाविक जखमी झाले. त्यातील सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी दोषी ट्रकचालक दिलीप चौधरी (रा. कारंजा घाडगे) याला अटक केली आहे.
आलोक मुनी महाराज यांच्या चातुर्मास प्रवेश शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी स्थानिक जैन बांधव खासगी प्रवासी बसने वणीकडे निघाले होते. वर्धमाननगरातून (सेंट्रल एव्हेन्यू) टेलिफोन एक्स्चेंज चौकात बस आली असता अतिशय वेगात आलेल्या ट्रक ( एमएच ३१/ एपी ४८८६) ने बसला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की स्फोटासारखा मोठा आवाज झाला. बसमधील सर्वच्या सर्व प्रवाशांना दुखापत झाली. त्यातील १३ प्रवासी भाविक जबर जखमी झाले.
पहाटे मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील मंडळी मोठ्या संख्येत तिकडे धावली. त्यांनी जखमींना मदतीचा हात देऊन बसबाहेर काढले. कमी प्रमाणात दुखापत झालेल्यांनी लगेच आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना फोन करून अपघाताची माहिती दिली. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून लकडगंज पोलिसांनाही अपघाताचे वृत्त कळले. त्यामुळे पोलिसांसह अनेक जैन बांधव मदतीसाठी तिकडे धावले. त्यांनी जखमींना खासगी इस्पितळात दाखल केले. लकडगंज पोलिसांनी आरोपी ट्रकचालक दिलीप चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
डॉक्टरांची तत्परता
या भीषण अपघाताची माहिती कळताच जैन समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलकडे धाव घेतली. डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. निशित मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी कमालीची तत्परता दाखवली. वृद्ध विमलादेवी नाहटा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या वाचू शकल्या नाही. उपरोक्त जखमींवर तातडीचे उपचार करण्यात आले. जखमींपैकी चारजण अतिदक्षता विभागात आहेत. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे संबंधितांनी लोकमतला सांगितले.
मोठा अनर्थ टळला
बसचालकाच्या बाजूला जतन मालू बसून होते. त्यांनी बसकडे बेदरकारणपणे ट्रक येत असल्याचे पाहून धोका ओळखला. त्यांनी लगेच चालकाला बसची गती वाढवण्यास सांगितले. त्यानुसार बसचालकाने बसचा वेग वाढवून चौकातून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकची गती एवढी जास्त होती की बसच्या मागच्या भागाला ट्रकने जोरदार धडक मारली. बसचालकाने तत्परता दाखवली नसती आणि धडक बसच्या मधल्या भागात बसली असती तर मोठा अनर्थ झाला होता. मालू आणि बसचालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणारा आरोपी ट्रकचालक दिलीप चौधरी (रा. कारंजा घाडगे) याला बसचालकानेच पकडून ठेवले. त्याला नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. लकडगंज पोलिसांनी त्याला अटक केली.