पहिले अखर्चित निधी खर्च करा
By admin | Published: June 10, 2017 03:04 AM2017-06-10T03:04:28+5:302017-06-10T03:04:28+5:30
शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत देण्यात आलेला निधी जि.प.च्या शिक्षण विभागाने खर्च केलेला नाही.
शिक्षण विभागाला सूचना : गणवेशाच्या अनुदानाचा मार्ग मोकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत देण्यात आलेला निधी जि.प.च्या शिक्षण विभागाने खर्च केलेला नाही. आता विद्यार्थ्यांना गणवेशाचे अनुदान विभागाला द्यायचे आहे. शिक्षण विभागाला त्यासाठी २.९ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. परंतु शासनाने जि.प.च्या शिक्षण विभागाला सर्व शिक्षा अभियानाचा अखर्चित असलेला निधी गणवेशावर खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाकडे अद्यापही १.९ कोटी रुपये शिल्लक आहे. हा निधी आता गणवेशाच्या अनुदानासाठी वापरण्यात येणार आहे.
शालेय गणवेशाचे अनुदान यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून थेट विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
येत्या २७ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. वर्ग १ ते ८ च्या १ लाख १२ हजार विद्यार्थ्यांना गणवेशासाठी निधी मिळणार आहे. त्यासाठी प्रती विद्यार्थी ४०० रुपयेप्रमाणे २ कोटी ९४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. परंतु शासनाने गणवेशासाठी शिक्षण विभागात शिल्लक असलेल्या निधीतून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे वळते करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासोबतच प्रत्येक शाळांनी पालकसभा घेऊन गणवेश खरेदीबाबत त्यांना सूचना करण्याचेही सांगण्यात आले आहे.
पालकांनी गणवेश खरेदी करून त्याची पावती शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांकडे जमा केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ४०० रुपये वळते करण्यात येणार आहे. नागपूर जिल्हा शिक्षण विभागाकडे गेल्या वर्षीचा सर्व शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी १ कोटी ९० लाखाचा निधी शिल्लक आहे.
सद्यस्थितीत शिल्लक निधीतून गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून, उर्वरित १ कोटी ४ लाखाचा निधी हा शाळा सुरू होण्यापूर्वीच विभागाच्या खात्यात वळते करण्यात येईल, असे शासनातर्फे कळविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी दिली.