एसपीजीचे रिपोर्टिंग अन् पीएमओचा रेड सिग्नल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 10:47 AM2019-09-07T10:47:03+5:302019-09-07T10:47:26+5:30
नागपुरात असलेल्या एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप)च्या अधिकाऱ्यांनी धोक्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पीएमओला नागपूर दौऱ्यातील अडथळे कळविले अन् पीएमओकडून शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांच्या शनिवारच्या नागपूर दौऱ्याला ‘रेड सिग्नल’ दाखवला.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो स्थानकाचे उद्घाटन आणि अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपुरातील रस्त्यांवर कारने ८० मिनिटांचा प्रवास करणार होते. त्यामुळे दिल्लीतील नेहमीच्या ताफ्यातील (कॅन्वॉय) आठ विशेष वाहने गुरुवारी रात्री नागपुरात पोहचली होती. दिल्ली-मुंबईसह ठिकठिकाणचे बीडीडीएस स्क्वॉडही आले होते. अतिरिक्त पाच बुलेट प्रूफ वाहने बोलावून ठेवण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणां ही सर्व जमवाजमव करीत असताना पाऊस मात्र मानायला तयार नव्हता. त्याने शुक्रवारी सकाळपासूनच नागपूरच्या रस्त्यांना नद्यांचे रूप दिल्याने सुरक्षा यंत्रणांवरचा ताण वाढला. नागपुरात असलेल्या एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप)च्या अधिकाऱ्यांनी धोक्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पीएमओला नागपूर दौऱ्यातील अडथळे कळविले अन् पीएमओकडून शुक्रवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांच्या शनिवारच्या नागपूर दौऱ्याला ‘रेड सिग्नल’ दाखवला.
नियोजित दौऱ्यानुसार, पंतप्रधान मोदी शनिवारी दुपारी ४.२० वाजता नागपूर विमानतळावर येणार होते. तेथून मेट्रो स्थानकावर, सीताबर्डी-लोकमान्यनगर मेट्रो स्थानकाचे उद्घाटन केल्यानंतर मानकापूर क्रीडा संकुलात आणि तेथील कार्यक्रम आटोपून ते विमानतळावर पोहचणार होते. पंतप्रधानांचा नागपूरच्या रस्त्यावरचा हा प्रवास साधारणत: ८० मिनिटांचा असेल, असा निष्कर्ष सुरक्षा यंत्रणांनी काढला होता. त्यामुळे कार्यक्रमस्थळांसह रस्त्यावरचा बंदोबस्त (रोड सिक्युरिटी) कशी असेल, त्याचा आराखडा सुरक्षा यंत्रणांनी तयार केला होता.
सुरक्षा व्यवस्थेचे (बंदोबस्त)नियोजन करण्यासाठी दिल्लीहून एसपीजी आणि मुंबईहून विशेष सुरक्षा पथके गुरुवारीच नागपुरात आली होती. बाह्य सुरक्षेसाठी ११ पोलीस उपायुक्तांसह एकूण २४०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पंतप्रधानांसाठी दिल्लीहून आठ विशेष वाहने बोलावून घेण्यात आली होती. स्थानिक व रेंजमधील पाच बुलेट प्रूफ वाहनेही तयार ठेवण्यात आली होती. याशिवाय एकूण ७५ वाहनांचा ताफा सज्ज करण्यात आला होता. नागपुरात दिवसभर पावसाचा तडाखा सुरू असताना एसपीजींचे अधिकारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह शनिवारच्या सुरक्षा व्यवस्थेची तयारी करीत होते. बॉम्बशोधक आणि नाशक पथकांनी (बीडीडीएस) आपापला मोर्चा सांभाळला होता. शुक्रवारी सकाळपासून उपराजधानीत पावसाने थैमान घातले होते.मेट्रोच्या नवनिर्मित पुलातूनही पाणी गळत होते. ते पाहून पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी (एसपीजी) पीएमओला धोक्याचा इशारा कळविला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास दिल्लीहून पंतप्रधान मोदी यांचा शनिवारचा दौरा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. ते कळल्याने प्रचंड दडपणात असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
भरपावसात रंगीत तालिमची तयारी
पंतप्रधानांचा नागपूरचा नियोजित दौरा रद्द करण्यासंबंधाने एसपीजींनी पीएमओला कळविले होते. मात्र, तिकडून या संबंधाने निर्णय येण्यास विलंब होत असल्याने एसपीजी आणि स्थानिक वरिष्ठांनी भरपावसातच रंगीत तालिम करून घेण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी ६.३० वाजता ७५ वाहनांचा काफिला नियोजित दौऱ्याच्या मार्गावरून धावण्याच्या तयारीत असतानाच पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याचा मेसेज स्थानिक वरिष्ठांना मिळाला अन् साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.