एसपीजीने नागपुरात घेतला पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आढावा; कडेकोट बंदोबस्त तैनात
By योगेश पांडे | Updated: March 27, 2025 23:43 IST2025-03-27T23:42:36+5:302025-03-27T23:43:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या दौऱ्याच्या निमित्ताने एसपीजीचे पथक नागपुरात दाखल झाले असून, गुरुवारी त्यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.

एसपीजीने नागपुरात घेतला पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आढावा; कडेकोट बंदोबस्त तैनात
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या दौऱ्याच्या निमित्ताने एसपीजीचे पथक नागपुरात दाखल झाले असून, गुरुवारी त्यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत चारही ठिकाणे तसेच दौऱ्याच्या मार्गावरील सुरक्षा बंदोबस्ताबाबत सखोल नियोजन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपूरला येत आहेत. सकाळी नऊ वाजता नागपुरात आगमन झाल्यावर ते रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्मृतिमंदिर, दीक्षाभूमी, माधव नेत्रालय तसेच अमरावती मार्गावरील सोलार एक्सप्लोझिव्हला भेट देतील.
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले एसपीजीचे पथक गुरुवारी नागपूरला पोहोचले. डीआयजींच्या नेतृत्वाखालील या पथकाने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पंतप्रधान ज्या ठिकाणी भेट देणार आहेत तेथील पाहणी केली. स्मृती मंदिर, दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालय हे शहर पोलिसांच्या अखत्यारीत येतात, तर सोलर एक्सप्लोसिव्हचा परिसर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येतो. एसपीजीच्या पथकाने पोलिसांना सुरक्षेसंबंधी सूचना दिल्या आहेत.
चार हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त
नागपुरात मागील आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांसह चार हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बाहेरील जिल्ह्यांमधूनही १५० अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.
सायबर सेलकडून सोशल माध्यमांवर वॉच
१७ मार्च रोजी समाजमाध्यमांवर अनेक आक्षेपार्ह मजकूर, चित्रफिती, छायाचित्रे शेअर झाली व त्यानंतर हिंसाचार-जाळपोळ करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सायबर सेलकडून सोशल माध्यमांवर बारीक लक्ष देण्यात येत आहे.