उपराजधानीची हवाईसेवा विस्तारणार : ‘स्पाईसजेट’देखील घेणार ‘एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 09:42 AM2018-08-10T09:42:28+5:302018-08-10T09:42:57+5:30
लवकरच नागपूरची हवाईसेवा विस्तारणार आहे. देशातील नऊ शहरांसाठी नागपुरातून हवाईसेवा सुरू होणार असून, यामुळे अनेक नागरिकांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतून केवळ निवडक शहरांसाठी हवाईसेवा उपलब्ध असून, देशातील इतर महत्त्वाची शहरे अद्यापही जोडली गेली नसल्याची खंत नागपूरकरांकडून अनेकदा व्यक्त करण्यात येते. मात्र नागरिकांना दिलासा मिळणार असून, लवकरच नागपूरची हवाईसेवा विस्तारणार आहे. देशातील नऊ शहरांसाठी नागपुरातून हवाईसेवा सुरू होणार असून, यामुळे अनेक नागरिकांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यापासून भोपाळ, जबलपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जयपूर, चेन्नई, भुवनेश्वर आणि अहमदाबाद या शहरांसाठी थेट उड्डाण सुरू होईल. सोबतच अलाहाबादसाठी नागपुरातून दुसरी ‘फ्लाईट’देखील या कालावधीत सुरू होण्याची शक्यता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळातून ‘इंडिगो एअरलाईन्स’तर्फे सर्वात जास्त विमानांचे उड्डाण होते. ‘इंडिगो’च्या ताफ्यात नवीन विमाने येणार आहेत. ‘एअरलाईन’ भोपाळ, जबलपुर, कोल्हापूर, अलाहाबाद आणि औरंगाबादसाठी ‘स्पॉट अॅप्रुव्हल’च्या तयारीत आहे. नुकतेच ‘इंडिगो’ने स्थापनेची १२ वर्षे पूर्ण केली. याच वेळी नागपुरातून सेवा विस्तार करण्याचे संकेत देण्यात आले होते.
वरील शहरांसाठी हवाईसेवा सुरू करण्याचा मुद्दा ‘पाईपलाईन’मध्ये आहे व हिवाळ्यात याची सुरुवात होऊ शकते, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. यासोबतच चेन्नई, भुवनेश्वर, जयपूर आणि अहमदाबाद या शहरांसाठी ‘स्पाईसजेट’कडूनदेखील मैदानात उतरण्याची तयारी सुरू आहे. सद्यस्थितीत ‘स्पाईसजेट’चे एकही विमान नागपूर विमानतळाहून उड्डाण भरत नाही. ‘मिहान’मधील ‘एअर इंडिया-एमआरओ’ने काही महिन्यांअगोदर ‘स्पाईसजेट’सोबत करार केला होता. यावेळी ‘स्पाईसजेट’च्या ‘सीईओ’ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुरातून नवीन उड्डाणे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
‘एलसीसी’मध्ये वाढेल स्पर्धा
हिवाळ्याच्या काळात हवाई प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते. वरील हवाईमार्गांवर दोन्ही ‘एअरलाईन्स’शिवाय आणखी तिसरी कंपनीदेखील परवानगी प्राप्त करून ‘आॅपरेशन’ सुरू करू शकते. सद्यस्थितीत नागपुरातून ‘जेट एअरवेज’, ‘एअर इंडिया’, ‘इंडिगो’, ‘जेटलाईट’, ‘गो एअर’, ‘एअर एशिया’ या ‘एव्हिएशन’ कंपन्या उड्डाण संचालित करत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, बंगळुरू, इंदूर, रायपूर, कोलकाता, पुणे आणि हैदराबाद थेट हवाईसेवा उपलब्ध आहे. यात सर्वाधिक १५ उड्डाणे ‘इंडिगो एअरलाईन्स’ची आहेत. ‘लो कॉस्ट कॅरिअर’ असताना ‘स्पाईसजेट’चा शिरकाव झाल्यास नागपुरात ‘एव्हिएशन’ कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढीस लागेल.