कोळी पार्कच्या प्रस्तावालाच कोळिष्टके : डॉ. वानखेडेंच्या संशोधनानंतर चिखलदरामध्ये होते उभारणीचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:33 PM2021-05-20T23:33:19+5:302021-05-20T23:35:14+5:30
चिखलदरामध्ये स्पायडर म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून रेंगाळत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून दोन वनमंत्र्यांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू होते. मागील आर्थिक वर्षात प्रस्ताव तयार करून वन मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे; पण कोरोनातील खर्चकपातीमुळे त्याला गतीच मिळाली नाही. त्यामुळे कोळ्यांवर संशोधन करणारे डॉ. जी. एन. वानखेडे यांचे हे संशोधन अभ्यासात्मकदृष्ट्या जगासमोर कधी येणार, याची प्रतीक्षा वन्यजीव अभ्यासकांना लागून राहिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चिखलदरामध्ये स्पायडर म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून रेंगाळत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून दोन वनमंत्र्यांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू होते. मागील आर्थिक वर्षात प्रस्ताव तयार करून वन मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे; पण कोरोनातील खर्चकपातीमुळे त्याला गतीच मिळाली नाही. त्यामुळे कोळ्यांवर संशोधन करणारे डॉ. जी. एन. वानखेडे यांचे हे संशोधन अभ्यासात्मकदृष्ट्या जगासमोर कधी येणार, याची प्रतीक्षा वन्यजीव अभ्यासकांना लागून राहिली आहे.
कोळ्यांवरील संशोधन आणि अध्ययन हा दृष्टिकोन पुढे ठेवून चिखलदरामध्ये स्पायडर म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव मागील तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी चर्चेत आला होता. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि नंतर संजय राठोड यांच्याशी स्थानिक पातळीवर चर्चाही झाली होती. त्यानंतर मागील आर्थिक वर्षात चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेने प्रस्ताव तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इस्टिमेटसह तयार करून तत्कालीन वनमंत्र्यांकडे सोपविला होता. त्यानंतर तो मंजुरीसाठी वन मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. अमरावती विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. एन. वानखेडे यांनी मध्य भारतामध्ये कोळ्यांच्या संदर्भात मोठे काम आणि संशोधन केले होते. या संशोधनादरम्यान अनेक प्रजातींच्या कोळ्यांचे संकलनही करण्यात आले होते. या विषयावर त्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून आंतराष्ट्रीय सेमिनारही भरविले होते. त्यावर शोधप्रबंधही तयार आहेत. अमरावती जिल्ह्यातील वन्यजीव व आणि कीटक अभ्यासक अतुल बोडखे, यादवराव तरारे-पाटील, शिरभाते, आदींचा सहभाग होता.
चिखलदराच का ?
चिखलदरा येथील वन विभागाच्या वन प्रशिक्षण केंद्रामध्ये हे म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे डॉ. वानखेडे यांच्या कार्याला चालना मिळेल, असा यामागील हेतू होता. तसेच, चिखलदरा हे देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने देश-विदेशांतील पर्यटक आणि अभ्यासक येतात. यामुळे हे कार्य सहजपणे अभ्यासकांपर्यंत पोहोचेल आणि संदर्भासाठी सोईचे होईल, अशी यामागील मध्यवर्ती संकल्पना होती. विद्यापीठाचेही या कामी सहकार्य घेण्याचे ठरले होते.
चिखलदरा येथे स्पायडर म्युझियम उभारण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी प्रस्ताव दिला असला तरी अद्याप गती आलेली नाही. आमचा पाठपुरावा सुरू आहे. राज्य वन्यजीव मंडळाचा सदस्य नात्याने पुढील बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडणार आहोत.
- यादव तरटे-पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ
स्पायडर म्युझियम उभारणीसाठी चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेकडून मागील वर्षी प्रस्ताव आला. तो मंजुरीसाठी वन मंत्रालयाकडे पाठविला आहे. मागील तीन-चार वर्षांपासून यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- रवींद्र वानखेडे, मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण), पुणे