बोटाच्या नखावर बसेल एवढ्या आकाराचा चरखा; नागपुरातील तरुणाची कल्पकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 07:14 AM2021-10-02T07:14:00+5:302021-10-02T07:15:01+5:30
Nagpur News नागपूरचे जयंत तांदुळकर यांनी तयार केलेला चरखा चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. या चरख्याची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
नागपूर : महात्मा गांधींनी ज्या चरख्याच्या बळावर देशात क्रांती घडविली आणि गांधीजींचा चरखा अख्ख्या जगात प्रसिद्ध झाला. नागपूरचे जयंत तांदुळकर यांनीही तयार केलेला चरखा चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. या चरख्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो चरखा अतिशय लहान आहे. त्यांच्या या चरख्याची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल या पदावर कार्यरत असलेल्या जयंत तांदुळकर यांना लहानपणापासून नवनवीन कलाकृती बनविण्याचा छंद होता. त्यांनी काचेच्या बाटलीच्या आत अनेक प्रकारच्या कलाकृती बनवल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमधून विणलेल्या छोट्या खाटाही बनवल्या गेल्या आहेत. यासह एक लहान आकाराची भगवदगीता देखील बनवली गेली आहे. त्याच धर्तीवर सुत कताईचा लहान आकाराच्या चरख्यांच्या प्रतिकृती बनविल्या आहेत.
त्यापैकी एक चरखा ज्याची लांबी ३.२० मिमी रुंदी, २.६८ मिमी व उंची ३.०६ मिमी आहे. हा चरखा तयार करण्यासाठी लहान लाकडी काड्या, स्टील तार, आणि कापूस धागा इत्यादी वस्तूंचा वापर केला आहे. या चारख्याचे वैशिष्ट्य म्हणजे, एवढ्या लहान आकाराचा चरखा असूनही त्यावर सूत कातन्याचे कार्य करता येते. तो एक पूर्णपणे कार्यरत चरखा आहे. हा जगातील सर्वात लहान आकाराचा चरखा असल्याचा दावा तांदुळकर यांनी केला आहे. या चरख्याची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१ आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१ मध्ये नोंद झालेली आहे. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी ही नामांकित करण्यात आले आहे.