आध्यात्मिक; स्पर्धा स्वत:शीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:43 PM2018-09-08T12:43:18+5:302018-09-08T12:44:14+5:30

दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा जेव्हा आपण एकमेकांशी सहकार्य करतो तेव्हाच आपल्या सगळ्यांचा सर्वांगीण विकास होतो.

Spiritual; Competition with yourself | आध्यात्मिक; स्पर्धा स्वत:शीच

आध्यात्मिक; स्पर्धा स्वत:शीच

Next
ठळक मुद्देएकमेकां साह्य करुं, अवघे धरू सुपंथ

प्रा. डॉ. संदीप ताटेवार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
आमच्या मित्रमंडळीने सहलीला जाण्यासाठी दोन बसेस ठरविल्या होत्या. एक बस समोर होती. आमची बस मागे होती. प्रवास सुखदपणे सुरु झाला. आमच्या बसमधील लोक छान गाण्याच्या भेंड्या खेळत होते. काही लोक गप्पागोष्टीत रंगले होते. प्रत्येकजण आनंदात होते. तितक्यात आमच्यापैकी एकजण म्हणाला की, आपली बस त्यांच्या बस समोर गेली पाहिजे. सर्वांनी माना डोकावल्या. आमची बस खूप वेगाने पळायला लागली. आता बसमधील लोकांनी गाणे म्हणायचे व छान गप्पागोष्टी करायच्या सोडून आपली बस व पुढची बस यामधील अंतरावर लक्ष केंद्रीत केले. थोड्याच वेळात सुरळीतपणे चालू असलेल्या आमच्या बसमध्ये अति गतीमुळे कंप जाणवू लागले त्यामुळे प्रवाशांना धक्के बसू लागले. जशी जशी दोन्हीही बस मधील अंतर कमी जास्त होऊ लागले तसे तसे बसमधील प्रवाशांच्या चेहऱ्यांवर तणाव जाणवू लागला. आता दोन्हीही बसमध्ये स्पर्धा निर्माण झाली होती. चांगला आनंदात चालू असलेला प्रवासाचे रुपांतर काहीही कारण नसतांना तणावात झाले होते.
आपल्या आयुष्याचं असंच असतं. आपला चांगला सुखात चालू असलेला आयुष्याचा प्रवास आपण दुसऱ्यांशी अनावश्यक स्पर्धा करून दु:खात रुपांतरित करीत असतो. खरंतर, स्पर्धा आपण आपल्या स्वत:शीच करायला पाहिजे. पहिले मी कसा होतो व आता कसा आहे? माझ्यामध्ये पहिले किती दुर्गुण होते, आता किती राहिले आहेत? माझ्या मनामध्ये कोणत्या चुकीच्या मान्यता होत्या व त्या घालविण्यासाठी मला किती वेगाने प्रयत्न करावे लागतील, याबाबत स्वत:शी स्पर्धा करायला पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्यांशी स्पर्धा करीत नाही तेव्हा आपलं मन शांत असते. आपली कल्पकता वाढते, सकारात्मकता वाढते, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. एक स्वछ, निर्मळ व सुंदर जीवन आपण जगू शकतो. स्पर्धेमुळे इर्षा, असूया, क्रोध, मत्सर, अहंकार हे दुर्गुण वाढीस लागतात. आज समाजात प्रत्येकजण एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. स्पर्धा जिंकण्यासाठी एकमेकांना मागे ओढत व तुडवत पुढे जाण्याचा सर्वजण प्रयत्न करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा जेव्हा आपण एकमेकांशी सहकार्य करतो तेव्हाच आपल्या सगळ्यांचा सर्वांगीण विकास होतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात,
एकमेकां साह्य करुं, अवघे धरू सुपंथ
************************

Web Title: Spiritual; Competition with yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.