अध्यात्मिक; यम नियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:04 AM2018-09-22T10:04:00+5:302018-09-22T10:04:24+5:30
विज्ञानाची जशी प्रगती होत गेली तसा माणूस आधुनिक व गतिमान होत गेला. त्यामुळे त्याची ऐहिक सुखाची लालसा वाढत गेली. तो शारीरिक कष्टापासून व अध्यात्मापासून दूर होत गेला.
प्रा. डॉ. संदीप ताटेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विज्ञानाची जशी प्रगती होत गेली तसा माणूस आधुनिक व गतिमान होत गेला. त्यामुळे त्याची ऐहिक सुखाची लालसा वाढत गेली. तो शारीरिक कष्टापासून व अध्यात्मापासून दूर होत गेला. त्याचा परिणाम म्हणजे शारिरीक व मानसिक दृष्ट्या तो कमजोर होत गेला. महर्षी पतंजली यांनी प्राचीन काळी योगसूत्र हा ग्रंथ लिहून त्यामध्ये योग सूत्र विशद केले. माणसाचे चित्त एकाग्र, स्थिर व निर्मळ असेल तर तो मानसिकदृष्ट्या सक्षम असतो. चित्त स्थिर राहण्यासाठी माणसाची वृत्ती कारणीभूत असते. महर्षी पतंजलि म्हणतात,
तदा द्रष्टे: स्वरूपे अवस्थानम !
योग साधनेमुळे साधकाची वृत्ती शांत होऊन चित्त निर्मळ होते. त्यांनी सांगितलेले अष्टांग योग मानवाला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी फार महत्वाचे आहे. ते म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. यमाचे पाच प्रकार म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य व अपरिग्रह. जीवन जगत असतांना आपल्या बोलण्यात, वागण्यात, आचरणात अहिंसा असायला पाहिजे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असे आपले वर्तन असायला पाहिजे. आपण नेहमी सत्याचा अंगिकार करायला पाहिजे. जेव्हा आपण खोटं बोलत असतो त्यामुळे आपला तणाव वाढतो. अस्तेय म्हणजे आपण लोभ टाळला पाहिजे. दुसऱ्याचे हिसकावून घेण्याच्या वृत्तीमुळे तणाव वाढत जातो. ब्रम्हचर्य म्हणजे ब्रम्हासारखे सत्विक आहार, विचार व आचरण . यामुळे तणाव कमी होतो. अपरिग्रह म्हणजे संग्रह करण्याची वृत्ती. जेव्हा पिढ्यानपिढ्या आपण संग्रह करतो तेव्हा हे माझ्यापासून सुटून जाणार तर नाही या भावनेमुळे तणाव वाढतो. नियमाचे पाच प्रकार सांगितले आहे. पाहिले शोच म्हणजे आंतरिक व बाह्य शुद्धी. आपण शारीरिक व मानसिक स्वच्छता ठेवायला पाहिजे. दुसरे संतोष म्हणजे समाधानी, आनंदी, हसत खेळत जीवन जगणे. तिसरे तप म्हणजे कामात सातत्य असणे व परिस्थितीला धैर्याने तोंड देणे. चौथे स्वाध्याय म्हणजे चांगले ज्ञान प्राप्त करणे व पाचवे ईश्वर प्रणिधान म्हणजे कुठेतरी निसर्ग शक्ती किंवा ईश्वर आहे यावर विश्वास ठेवून त्याला शरण जावून आपल्या कर्माचा भार ठेवून आयुष्य जगणे. यम नियमाचे पालन केल्यास आपले जीवन सुखमय व आनंदीमय होते.