विज्ञाननिष्ठा असल्याशिवाय अध्यात्म साधत नाही - डॉ. मोहन भागवत
By जितेंद्र ढवळे | Published: November 18, 2023 08:20 PM2023-11-18T20:20:18+5:302023-11-18T20:20:28+5:30
श्री नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद जन्मशताब्दी समापन सोहळ्याचे उद्घाटन
नागपूर : विज्ञान हे बाह्यजगाचा शोध घेते तर अध्यात्म हे अंत:स्फूर्तीचा आधार आहे. विज्ञाननिष्ठा असल्याशिवाय अध्यात्म साधता येत नाही आणि अध्यात्म असल्याशिवाय विज्ञान कळत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
श्री शांतिपुरुष सेवा संस्थेतर्फे श्री चैतन्यानंद सरस्वती नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद (१२५ वर्षे) जन्मशताब्दी समापन समारोहाचे उद्घाटन भागवत यांच्या हस्ते झाले. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती; तर अध्यक्षस्थानी श्री शांतिपुरुष सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबामहाराज तराणेकर, कार्याध्यक्ष राजीव हिंगवे व तेजस तराणेकर, कांचन गडकरी उपस्थित होत्या.
अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे मुखपत्र ‘श्री शांतिपुरुष’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. मोहन भागवत म्हणाले, आपली परंपरा सनातन असून त्यावेळच्या लोकांचा मन व बुद्धीचा स्तर आजच्या लोकांपेक्षा खूप वेगळा होता. त्या काळी जे तत्त्वदर्शन झाले, ते आज उलगडून दाखवण्याचे काम संतमहात्मे करत असतात. श्री दत्ताची उपासना ही गुरुउपासना आहे. सगळ्या जगाच्या गुरुसत्तेचे प्रतीक दत्तमहाराज आहेत, असे ते म्हणाले. संचालन व आभार प्रदर्शन किशोर गलांडे यांनी केले.
त्रिपदी परिवारचे लोकसेवा हे वैशिष्ट्ये - नितीन गडकरी
अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून नवीन पिढीमध्ये व समाजामध्ये गुणात्मक परिर्वतन घडवून आणण्याचे कार्य त्रिपदी परिवार करीत आहे. लोकशिक्षण आणि लोकसंस्कारांबरोबरच लोकसेवा हेदेखील त्रिपदी परिवारचे वैशिष्ट्य आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नानामहाराजांचे लहानपणी अनेकदा दर्शन घेण्याची संधी मिळाली आहे. बाबामहाराजांनी त्यांचे कार्य यशस्वीपणे पुढे चालवले आहे. विज्ञानाची जोड देऊन अध्यात्माला पुढे नेण्याचे काम बाबामहाराज करीत आहेत, असे गडकरी म्हणाले.