वर्दीतील शिस्तबद्ध पोलिसांचे उत्स्फूर्त रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:59+5:302021-07-09T04:06:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर ...

Spontaneous blood donation of uniformed disciplined police | वर्दीतील शिस्तबद्ध पोलिसांचे उत्स्फूर्त रक्तदान

वर्दीतील शिस्तबद्ध पोलिसांचे उत्स्फूर्त रक्तदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर राज्यभरात सुरू असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तसंकलन महायज्ञात गुरुवारी आणखी एक नवा पैलू जुळला. कडक वर्दीतील शिस्तबद्ध पोलीस जवान, त्यांचा उत्साह द्विगुणित करणारे लोकमतचे स्फुरणगीत आणि मेघराजाने लावलेली रिमझिम हजेरी पोलीस मुख्यालयातील रक्तदान शिबिरात अनोखा जोश भरणारी ठरली.

लोकमत व शहर पोलिसांच्यावतीने गुरुवारी पोलीस मुख्यालयाच्या अलंकार सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह ८१ जणांनी आपले कर्तव्य बजावतानाच रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्यही पार पाडले.

स्व. श्री. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दीप प्रज्वलित करून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सकाळी ११ वाजता या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त (मुख्यालय) डॉ. संदीप पखाले, लोकमत समाचारचे सहायक उपाध्यक्ष मतीन खान, पोलीस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. संदीप शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.

---

पोलिसांचा काैतुकास्पद उत्साह

रक्तदानासाठी महिला-पुरुष पोलिसांचा उत्साह काैतुकास्पद होता. अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके आणि उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांनी स्वत: रक्तदान केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्साहात आणखीच भर पडली. राखीव निरीक्षक परिहार, सहायक निरीक्षक मिलिंद तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.

---

ते निघाले ... ते अडकले ।

एकाच वेळी सभागृहात गर्दी होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने रक्तदानासाठी पोहचण्याचे आवाहन करण्यात आले होते. पाऊस सुरू असूनही पावसाला न जुमानता अनेक पोलीस कर्मचारी रक्तदानाला पोहचले. मात्र, दुपारपासून पावसाचा जोर जास्त असल्याने अनेकजण पावसात भिजले. रक्तदानासाठी वेगवेगळ्या भागातून निघालेले २०० वर पोलीस पावसामुळे मध्येच अडकून पडल्याने आणि नंतर वेळीच कर्तव्यावर पोहचायचे असल्याने इच्छा असूनही ते रक्तदान करू शकले नाही.

----

Web Title: Spontaneous blood donation of uniformed disciplined police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.