‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानात दात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:10+5:302021-07-08T04:07:10+5:30
- चार ठिकाणी पार पडले रक्तदान शिबिर : तरुण-तरुणींसह नागरिकांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी ...
- चार ठिकाणी पार पडले रक्तदान शिबिर : तरुण-तरुणींसह नागरिकांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर २ ते १५ जुलै दरम्यान राज्यस्तरीय रक्तसंकलन मोहीम ‘लोकमत रक्ताचं नातं’ राबविण्यात येत आहे. राज्यभरात या मोहिमेला विविध सामाजिक संघटना व नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. रक्तदानाच्या या राष्ट्रीय कर्तव्यात आपला सहभाग नोंदवून नागरिकही समाजाप्रति आपल्या कृतज्ञता व्यक्त करत आहेत. बुधवारी नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दीनदयालनगर येथील राधेमंगलम सभागृह, शासकीय दंत महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालय सभागृह, किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्था व परिवर्तन महिला समितीच्या वतीने बुटीबोरी येथे तर बीसीएन व बीटीपी ग्रुपच्या वतीने सोमवारी क्वॉर्टर येथील संत रविदास सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले.
बीसीएन, बीटीपी ग्रुपने रक्तदानातून खुलवले हास्य
- रक्तदानासाठी नागरिकांमध्ये केली जनजागृती : सिराज शेख यांनी घेतला पुढाकार
नागपूर : बीसीएन व बीटीपी समूहाच्या वतीने लोकमतच्या सहकार्याने बुधवारी सोमवारी क्वॉर्टर येथील संत रविदास सभागृहात ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत महारक्तदान शिबिराचे आयोजन झाले. या उपक्रमातून गरजवंतांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची किमया समूहाचे अध्यक्ष सिराज शेख यांनी साधली.
बुधवारी सिराज शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरासोबतच नि:शुल्क रोगनिदान शिबिर, मोफत चष्मे वितरणाचे आयोजन झाले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी भाजपा शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, नगरसेवक सतीश होले, वैद्यकीय अधीक्षक अविनाश गावंडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे उपस्थित होते. यावेळी शहरातील २९ कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिरांतर्गत समूहाने तुकडोजी चौक ते क्रीडा चौक दरम्यान वृक्षारोपण करून त्यांचे तीन वर्षासाठीचे पालकत्व स्वीकारले. या शिबिरात सूर्योदय रुग्णालय, सार्थक बहुउद्देशीय संस्था, ॲडव्हांस डेंटल केअर, शबानी मोटलानी, ऑटो गॅलरी यांनी सहकार्य दिले.
.....................