भिवापूरच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:57+5:302021-07-07T04:10:57+5:30
- तरुणांनी मोठ्या संख्येने केले रक्तदान भिवापूर : ‘लोकमत’च्या वतीने स्वातंत्र्यसंग्रमाम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ...
- तरुणांनी मोठ्या संख्येने केले रक्तदान
भिवापूर : ‘लोकमत’च्या वतीने स्वातंत्र्यसंग्रमाम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत राज्यभर २ ते १५ जुलैच्या दरम्यान महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत लोकमत समूह व भाजप भिवापूर शहराच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी भिवापूर येथे आयोजीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करत, राष्ट्रीय सेवाकार्याचे दायित्व जपले.
स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आ.सुधीर पारवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे प्रदेश सरचिटणीस आनंद राऊत, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष चरणजितसिंग अरोरा, जिल्हा महामंत्री रोहीत पारवे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संदीप निंबार्ते, स्वप्निल हरणे, किशोर पारवे, आनंद गुप्ता, विवेक ठाकरे, अविनाश चिमुकर, विनोद अग्रवाल, अरविंद चौधरी, हिमांशू अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही मोहीम ग्रामीण भागात सामाजिक भाव निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन सुधीर पारवे यांनी याप्रसंगी केले. आनंद राऊत यांनीही ‘लोकमत’च्या या लोकहितार्थ चळवळीत भाजपही सोबत असल्याचे सांगितले. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत रक्ताचा तुटवडा असताना, आयोजित केलेले हे शिबिर अनमोल असल्याचे मत राजू राऊत यांनी व्यक्त केले. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल आनंद राऊत यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी संजय गुप्ता, आशुतोष मोरे, गजू खांदे, भूषण नागोसे, अनिकेत वराडे, अमोल वारजूरकर, संकेत साबळे, गजानन जगथाप, धनराज चौधरी, प्रतीक ठाकरे, ओमकार पोटेकर, सचिन ठवकर, नीलिमा नागोशे, वंदना चौधरी आदी उपस्थित होते.
महायज्ञात पोलिसांनीही केले रक्तदान
रक्तदान शिबिरात ठाणेदार महेश भोरटेकर यांच्यासह पोलीस विभागही सहभागी झाला होता. यावेळी दहा पोलीस बांधवांनी रक्तदान केले, शिवाय जिल्हा परिषद व खासगी शिक्षक, मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचे अधिकारी, नगरपंचायत, कृषी विभाग, बँकेचे कर्मचारी, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, भीमादेवी क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनीही रक्तदान केले. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.मोतीराज चव्हाण व रासेयो प्रतिनिधी संकेत साबळे यांचे सहकार्य लाभले.
----
मुंबई आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रक्तदाते
मुंबई येथील फार्मा कंपनीचे संचालक स्वप्निल हरने यांनीही ‘लोकमत’च्या रक्तदान शिबिरात रक्तदान केले, शिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील आठ रक्तदात्यांनी शिबिराला हजेरी लावत रक्तदान केले. उमरेड, नक्षी, वासी, कारगाव, जवळी येथील तरुणांनीही रक्तदान केले.