‘सुपाेषण’कडे वाटचाल उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:12 AM2021-09-05T04:12:49+5:302021-09-05T04:12:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : स्थानिक पंचायत समिती सभागृहात एकात्मिक बालविकास सेवा याेजना प्रकल्प व अदानी फाऊंडेशन सावनेर यांच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : स्थानिक पंचायत समिती सभागृहात एकात्मिक बालविकास सेवा याेजना प्रकल्प व अदानी फाऊंडेशन सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पाेषण माहअंतर्गत ‘सुपाेषण’कडे वाटचाल उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला तालुक्यातील विविध गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अनिल नागणे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी दामाेधर कुंभरे, माजी पं. स. सदस्य गाेविंदा ठाकरे, अदानी फाऊंडेशनच्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती हाेती. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. राष्ट्रीय पाेषण महा ही एक चळवळ आहे. यात महिला, किशाेरवयीन बालिका व लहान मुलांना पाेषण आहार, सकस आहार विषयीचे महत्त्व पटवून दिले जाते. कार्यक्रमात आहार प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात आले हाेते. पाेषण रांगाेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. उत्कृष्ट आहार पदार्थ बनवून आणणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि सुपाेषण संगिनींना बक्षीस देऊन गाैरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी दामाेधर कुंभरे यांनी केले. संचालन प्रिया वाघमारे यांनी केले तर आभार सारिका चिंचखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सुपाेषण संगिनी, आशावर्कर, बालविकास प्रकल्पातील कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध गावातील महिला, किशाेरवयीन मुली आदींची माेठ्या संख्येत उपस्थिती हाेती.