रक्तदानाच्या महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:23+5:302021-07-11T04:07:23+5:30
नागपूर : 'लोकमत'च्यावतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व 'लोकमत'चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'लोकमत रक्ताचं नातं' या ...
नागपूर : 'लोकमत'च्यावतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व 'लोकमत'चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'लोकमत रक्ताचं नातं' या मोहिमेंतर्गत राज्यभर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यास शनिवारी नागपूर जिल्ह्यातील खापा (ता.सावनेर), कामठी, हिंगणा आणि कळमेश्वर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चारही तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्यावतीने नागरिकांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यासोबतच 'लोकमत रक्ताचं नातं' या मोहिमेचे कौतुकही केले. आपल्या माध्यमातून इतरांचे प्राण वाचावेत या उदात्त हेतूने नागरिक स्वयंस्फूर्तपणे या शिबिरात सहभागी होत आहेत.
‘रक्तदान’ चळवळ म्हणून राबविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा तहसीलदार हिंगे यांचे आवाहन
कामठी : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात रक्तदात्यांची मोठी साखळी तयार होत आहे. आता ‘रक्तदान’ चळवळ म्हणून राबविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले.
‘लोकमत’व सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पोरवाल महाविद्यालय सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी हिंगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम बागडे होते. प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी अंशुजा गराटे, नवीन कामठीचे ठाणेदार विजय मालचे, जुनी कामठीचे ठाणेदार राहुल सिरे, कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी, येरखेड्याच्या सरपंच मंगला कारेमोरे, रनाळ्याच्या सरपंच सुवर्णा साबळे, खैरीच्या सरपंच मोरेश्वर कापसे, घोरपडच्या सरपंच तारा कडू, नगर सेविका संध्या रायबोले, उपप्राचार्य डॉ. रेणुका तिवारी, डॉ. विनय चव्हाण उपस्थित होते. रक्तसंकलनाचे कार्य मेयो हॉस्पिटलचे डॉ. सागर गवई, डॉ. आशिष वायकर, डॉ. गौरी सांगळे यांच्या चमूने केले. प्रास्ताविक लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रा. सुदाम राखडे यांनी केले. संचालन प्रा. असरार यांनी तर आभार डॉ. रेणुका तिवारी यांनी मानले. रक्तदान शिबिराला जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान, माजी उपसभापती बाळू गवते, उज्ज्वल रायबोले यांनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. विनोद शेंडे, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी डॉ. मोहम्मद असरार, प्रा. डॉ. किशोर ढोले, घनश्याम चाकोले, उमेश मस्के, कामरान जाफरी, रकीब भाई, राहुल शेळके, लीलाधर दवंडे, पंकज नारदेवार, मुकेश चकोले,सुधीर अपाले, प्रा. मनोज होले, प्रा. मनीष मुडे, प्रा. पराग सपाटे, मयुर गुरव, प्रफुल गुरव, बाबी महेंद्र, गजेंद्र वाट, नंदलाल यादव, सुषमा राखडे, प्रणय राखडे,चंदा माकडे, वंदना भस्मे, सरिता भोयर, राष्ट्रीय सेवा योजनचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेनेचे सैनिक यांनी सहकार्य केले.
ठाणेदार, सरपंच, सभापतींचेही रक्तदान
रक्तदान शिबिरात जुनी कामठीचे ठाणेदार राहुल सिरे, नायब तहसीलदार राजेंद्र माळी, पटवारी महासंघाचे अध्यक्ष संजय अनवाने, सचिव महेश कुलदीपवार, माजी उपसभापती देवेंद्र गवते, खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे यांनीही रक्तदान केले.