एसटीच्या ५० टक्के सवलतीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By नरेश डोंगरे | Published: March 19, 2023 01:57 PM2023-03-19T13:57:52+5:302023-03-19T13:58:27+5:30

प्रवासाचा पहिला दिवस : साडेबारा हजार महिलांनी घेतला लाभ

Spontaneous response of women to 50 percent concession of ST in nagpur | एसटीच्या ५० टक्के सवलतीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एसटीच्या ५० टक्के सवलतीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने एसटी बसमध्ये महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची केलेली घोषणा महिलांसोबत एसटी महामंडळाच्याही फायद्याची ठरली आहे. नागपूर विभागात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवार, १७ मार्चला तब्बल १२,४९३ महिलांनी प्रवास केला.

एसटी बसेसमध्ये महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची घोषणा विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्य सरकारने केली. सरकारने या योजनेला महिला सन्मान योजना असे नाव दिल्याचेही स्पष्ट केले. या निर्णयाची अंमलबजावणी १७ मार्चला सुरू झाली. पहिल्याच दिवशी, शुक्रवारी एसटी बसच्या प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ घेणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या १२,४९३ होती. शनिवारी, रविवारच्या प्रवाशांचा आकडा उपलब्ध झाला नाही.

एसटीच्या नागपूर विभागातील १७ मार्चचे चित्र

नागपूर विभागात एसटी बसेसच्या दरदिवशी १,८०० फेऱ्या होतात. त्यातून साधारणत: ७५ ते ८५ हजार प्रवासी प्रवास करतात. १७ मार्चलाही एकूण प्रवाशांची संख्या ७७,९०० होती. त्यात महिला प्रवासी १२,४९३ होत्या. त्यांच्याकडून एसटीला एकूण २,९१,८७५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे, नागपूर विभागात रामटेक आगारात सर्वाधिक २४७१ महिलांनी सवलतीच्या दरात प्रवास करून एसटीच्या तिजोरीत ५१,७९५ रुपयांचे उत्पन्न टाकले. सोमवारपासून हा आकडा निश्चित वाढेल, असा अंदाज एसटीच्या नियंत्रण समितीचे उपव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी वर्तविला.

-----
एसटीला सुगीचे दिवस येणार

२० वर्षांपूर्वी खासगी बस आणि टॅक्सीचा पर्याय नसल्यामुळे एसटी बसेसमध्ये पाय ठेवायला जागा नसायची. प्रत्येक बस प्रवाशांनी खच्चून भरलेली असायची. मात्र, खासगी बससह प्रवासासाठी अन्य पर्याय उपलब्ध झाले. एसटी पेक्षा चांगल्या सुविधा त्यांनी दिल्यामुळे एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. अलिकडे तर बसचा खडखडाट बघता प्रवासी एसटी बसला दुरूनच टाटा करीत होते. त्यामुळे अनेक बसेस रिकाम्या ठणठण धावत असल्याचे चित्र होते. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटीत महिला प्रवाशांची संख्या वाढणार आणि एसटीला पुन्हा सुगीचे दिवस येणार, असा विश्वास आता एसटीचे अधिकाऱ्यांना वाटत आहे.

Web Title: Spontaneous response of women to 50 percent concession of ST in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.