वैद्यकीय शिक्षणाचा खेळखंडोबा
By Admin | Published: February 3, 2016 02:59 AM2016-02-03T02:59:02+5:302016-02-03T02:59:02+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.
राज्यात वैद्यकीय शिक्षकांची ४३४ पदे रिक्त
सुमेध वाघमारे नागपूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत तोकड्या संख्येतील प्राध्यापक शिकविण्याचे आव्हान पेलत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या ५६, सहयोगी प्राध्यापकांच्या १५३ तर सहायक प्राध्यापकांच्या २२५ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे वैद्यकीय शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गरिबांच्या आरोग्य सेवेसाठी तयार झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) खरंच गरिबांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते काय, हा प्रश्न आज निर्माण झाला आहे. या रुग्णालयासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा शोध घ्यावा, अशी परिस्थिती आहे. रुग्णालयात सलाईन नाही, ते विकत आणले तर लावण्यासाठी इंजेक्शन नाहीत. अपघातामधील जखमींना कित्येक तास उपचार मिळत नाहीत. औषधांचा खर्च रु ग्णाच्या नातेवाईकांनाच करावा लागतो. एक्स-रे बंदच असतात, सिटीस्कॅन यंत्रणा आहे तर त्याला लागणारी फिल्म नाही. त्यामुळे तातडीचे आॅपरेशन करण्यात वेळ जातो. सफाई कर्मचाऱ्यांच्या तोकड्या संख्येमुळे स्वच्छतागृहे कुलपबंद आहेत. यात वरिष्ठ डॉक्टरांची अपुरी संख्या भरच टाकत आहे. राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३८२ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. यातील ५६ पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या ९६८ पदांना मंजुरी प्राप्त असताना १५३ पदे भरण्यातच आलेली नाहीत, तर सहायक प्राध्यापकांची १,४७८ पदांमधून १,२५३ पदे भरण्यात आली आहेत. २२५ पदे आजही रिक्त आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, लोक मिळत नसल्याचे कारण देऊन शासनातर्फे अनेक पदे रिक्त ठेवली जातात. या प्रकारामुळे जे प्राध्यापक कार्यरत आहेत त्यांच्या बढत्या थांबलेल्या आहेत. यातील अनेक जण निवृत्तीवर आले आहेत. रिक्त जागा भरल्या जात नसल्याने इच्छुक असणाऱ्या प्राध्यापकांवरही अन्याय होत आहे. (प्रतिनिधी)