दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडापाठोपाठ रेखाकलेचेही गुण गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:08 AM2021-03-31T04:08:08+5:302021-03-31T04:08:08+5:30
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २६ मार्च २०१९ ला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी ...
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २६ मार्च २०१९ ला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२० चे आयोजन न करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेखाकलेची परीक्षा देणारे विद्यार्थी सवलतीच्या वाढीव गुणांपासून वंचित राहणार आहेत.
राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षा २०२० चे आयोजन करण्यात येऊ नये. तसेच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नये, असा उल्लेख शासन निर्णयात आहे. त्यामुळे जे विद्यार्थी रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट पास आहेत तसेच जे विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा पास आहे, त्या विद्यार्थ्यांना आता रेखाकला परीक्षांचे सवलतीचे गुण मिळणार नाही. या निर्णयाची चित्रकलेच्या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान होणार असून, परीक्षेकरिता घेतलेली मेहनतही वाया जाणार आहे. जे विद्यार्थी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास आहेत अशा विद्यार्थ्यांना रेखाकला सवलतीच्या अंतर्गत असलेले गुण देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक व पालकांची आहे. असा निर्णय घेण्याचा कला संचालकांना अधिकारच नाही व तसेच हा विषय शालेय शिक्षण विभागाच्या अधिकार कक्षेत असून, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यात का हस्तक्षेप केला, असा सवाल चित्रकलेच्या शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
- परीक्षेत ग्रेडनुसार मिळणारे गुण
ए ग्रेड - ७
बी ग्रेड - ५
सी ग्रेड - ३
- एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेकरिता विद्यार्थी व चित्रकलेचे शिक्षक वर्षानुवर्षे कठीण मेहनत घेत असतात. यंदा परीक्षा झालीच नाही, याला विद्यार्थी व शिक्षक जबाबदार नाहीत. शासनाने पात्र विद्यार्थ्यांचे तरी रेखाकलेचे गुण द्यावे.
अरविंद मुडके, कला शिक्षक
- चित्रकलेच्या परीक्षेचे गुण हे आमच्यासाठी स्कोअरिंग असतात. परीक्षा कुठल्याही वर्गात असताना दिली तरी त्याचे गुण बोर्डाच्या परीक्षेत समाविष्ट होतात. पण यावेळी बोर्डाने चुकीचा निर्णय घेतला आहे.
प्रणय ठाकरे, विद्यार्थी
- शिक्षण विभाग १८ लाख विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेऊ शकते तर, फक्त आठ हजार विद्यार्थ्यांची रेखाकला परीक्षा का नाही? नियोजनशून्य प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, अन्यथा भविष्यात विद्यार्थी क्रीडा व चित्रकलेत सहभागी होणार नाही.
- अनिल शिवणकर, संयोजक, शिक्षक आघाडी