नागपुरात कॅन्डल मार्च काढून श्रीलंका हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:30 PM2019-04-23T23:30:44+5:302019-04-23T23:34:06+5:30
श्रीलंका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी संघर्ष वाहिनीच्यावतीने मंगळवारी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रीलंका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी संघर्ष वाहिनीच्यावतीने मंगळवारी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले.
रविवारी दहशतवादी संघटनेतर्फे सुसाईड बॉम्बरचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी आत्मघाती साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते, ज्यामध्ये ३०० च्या जवळपास निरपराध नागरिक प्राणास मुकले. या घटनेचा जगभरातून निषेध नोंदविला जात आहे. भारतातही या हल्ल्याची हळहळ व्यक्त केली जात असून समाजमन सुन्न झाले आहे. मंगळवारी शहरात संघर्ष वाहिनीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधान चौक येथे गोळा होऊन सुरुवातीला मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर संविधान चौक ते झिरो मॉईल चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध नोंदविला. यामध्ये दीनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, गणेश धुले, धर्मपाल शेंडे, शंकरराव फुंड, विनोद आकुलवार, लक्ष्मण पोटे, रामाजी जोगराणा आदी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होते. यादरम्यान सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांतर्फे श्रीलंका येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्लम सॉकरचे संस्थापक प्रा. विजय बारसे यांच्या नेतृत्वात रेव्ह. अमित शिंदे, जॉन थॉमस, सुभाष पाटील, विल्सन पाटील, लिओ पीटर, क्लॉडियस पीटर, चॉर्ल्स फ्रान्सिस, आस्मी फ्रान्सिस, स्पेन्सर जॉन, अॅम्ब्रोस मायकल, मायकल जॉन, जुलियट जॉन, संजीव फ्रान्सिस आदी उपस्थित होते. शोकसभेनंतर सर्व नागरिक संघर्ष वाहिनीतर्फे काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले.