प्रॉन्स व फिश करीवर श्रीलंकन क्रिकेटपटू लट्टू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 10:38 AM2017-11-23T10:38:48+5:302017-11-23T10:42:59+5:30
भारताविरुद्ध शुक्रवारपासून दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी येथे आलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना नागपूरच्या भोजनाची चव आवडली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : भारताविरुद्ध शुक्रवारपासून दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी येथे आलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना नागपूरच्या भोजनाची चव आवडली आहे. संत्रानगरी म्हणून जगभर ओळख असलेल्या या शहराने शेजारी देशाच्या खेळाडूंचे केलेले आदरतिथ्य त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरणार आहे. सामन्याचा निकाल काहीही असो, पण या भोजनाचा स्वाद मात्र त्यांना जीवनभर आठवणीत राहील.
बुधवारी सकाळच्या सत्रात जामठामध्ये सरावसत्रादरम्यान घाम गाळल्यानंतर श्रीलंका संघातील जवळजवळ सर्वंच खेळाडू वर्धा मार्गावरील हॉटेल ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’मध्ये दाखल झाले. वेळ होती सायंकाळी ७-७.१५ ची. बिग बाजारच्या मागच्या बोळीतील हॉटेलजवळ थांबलेल्या बसमुळे लोकांचे लक्ष वेधले गेले.
कडक सुरक्षा व्यवस्थेत दाखल झालेल्या या बसमध्ये श्रीलंकेचे खेळाडू होते. ते हॉटेलमध्ये दाखल होताच त्यांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.
जवळजवळ दोन तास खेळाडू हॉटेलमध्ये होते. हॉटेल व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक खेळाडूंनी कॉन्टिनेंटल व चायनीज भोजनाचा आस्वाद घेतला.
श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंनी प्रांज, फिश करी, चिकन बटर मसाला, नूडल्स आदी व्यंजनांना पसंती दर्शवली. नजिकच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या सत्रात कसून सराव करणाऱ्या पाहुण्या संघातील खेळाडूंनी ‘नागपुरी भोजना’चा आस्वाद घेण्याचे निश्चित केले होते.
दुपारी ३.३० वाजता हॉटेल व्यवस्थापनाला श्रीलंका संघाच्या भोजनाच्या कार्यक्रमाची सूचना मिळाली. हॉटेल व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, कदाचित श्रीलंका संघातील खेळाडूंनी हॉटेलची निवड गुगलवरील रिव्ह्यूद्वारे केली असावी.
रोशनला संक्रमणाचा त्रास
श्रीलंकेचे खेळाडू भोजनाचा आस्वाद घेत असताना एक युवा खेळाडू डोळ्यावर पट्टी बांधून हॉटेलच्या बाहेर येताना दिसला. माहिती काढली असता तो श्रीलंकेचा युवा खेळाडू रोशन सिल्वा होता. त्याला संकमणाचा त्रास झाला होता.