श्रीलंकेतील भाविक महिलेचा नागपुरात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:44 PM2020-03-18T23:44:53+5:302020-03-18T23:46:23+5:30
भारत दर्शनासाठी आलेल्या श्रीलंकेतील एका भाविक महिलेचा मृत्यू झाला. ही घटना कामठीच्या खैरी येथील बुद्धभूमीत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत दर्शनासाठी आलेल्या श्रीलंकेतील एका भाविक महिलेचा मृत्यू झाला. ही घटना कामठीच्या खैरी येथील बुद्धभूमीत घडली.
हेवा वितारणा दयादिलसिया (७४) असे मृत्यू पावलेल्या भाविक महिलेचे नाव आहे. हेवा श्रीलंकेच्या दमपिटिया येथील रहिवासी होत्या. हेवा यांच्यासह श्रीलंकेतील ५४ नागरिक भारतात बौद्ध तीर्थस्थळांची यात्रा करण्यासाठी २४ फेब्रुवारीला भारतात आल्या होते. सर्वजण २४ फेब्रुवारीला चेन्नईला पोहोचले. तेथून बौद्ध गया, सांचीसह अनेक ठिकाणी जाऊन मंगळवारी नागपुरात पोहोचले. या नागरिकांना ड्रॅगन पॅलेसला भेट द्यायची होती. त्यामुळे ते मंगळवारी सायंकाळी खैरीच्या बुद्धभूमीत थांबले. बुधवारी सकाळी ९ वाजता हेवा यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना त्वरीत कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची नवी कामठी पोलिसांना सूचना देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना श्रीलंकेच्या भाविक महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब लक्षात घेता पोलिसांनीही याची त्वरीत दखल घेतली. ठाणेदार संतोष बकाल आपल्या पथकासह तेथे पोहोचले. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला घटनेची माहिती दिली. हेवा यांच्यासोबत आलेल्या ५३ भाविकांची तब्येत ठीक आहे. कोणालाच ताप, खोकला किंवा सर्दी झाली नाही. कोरोनामुळे सर्वांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हेवा यांना रक्तदाब आणि मधुमेह असल्याची माहिती आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी श्रीलंकेतच अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे गुरुवारी शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह श्रीलंकेला रवाना करण्यात येणार आहे.