आईस स्केटिंगमध्येही सृष्टी गिनीज बुकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:23 AM2018-06-02T10:23:06+5:302018-06-02T10:23:16+5:30
लिंबो स्केटिंगमध्ये अनेक विक्रम नोंदविणाऱ्या सृष्टी शर्माने यात आणखी एका विक्रमाची भर घातली. सृष्टी आईस लिंबो स्केटिंगमध्ये स्वत:चे नाव ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात यशस्वी ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लिंबो स्केटिंगमध्ये अनेक विक्रम नोंदविणाऱ्या सृष्टी शर्माने यात आणखी एका विक्रमाची भर घातली. सृष्टी आईस लिंबो स्केटिंगमध्ये स्वत:चे नाव ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात यशस्वी ठरली.
सृष्टीने गुडगावमधील अॅम्बियन्स मॉलमध्ये २८ डिसेंबर २०१७ रोजी ‘लोएस्ट आईस स्केटिंग ओव्हर १० मीटर’ गटात १७.७८ सेंटिमीटरखालून १० मीटर अंतर पूर्ण करीत गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले. यावर शिक्कामोर्तब १२ एप्रिल रोजी आलेल्या एक ई-मेलच्या माध्यमातून झाले. यापूर्वी सृष्टीने लिंबो स्के टिंगच्या वेगवेगळ्या प्रकारात तीनवेळा विश्वविक्रम नोंदवला आहे. सृष्टीच्या यशात तिच्या कुटुंबीयांनी घेतलेली मेहनत व भावनिकतेच्या मुद्याला विशेष महत्त्व आहे.
शुक्रवारी सृष्टीसह ‘लोकमत’ कार्यालयात आलेले तिचे वडील धर्मेंद्र शर्मा व आई यांनी मुलीसाठी घेतलेल्या कठोर मेहनतीबाबत सांगितले. आईस स्केटिंगच्या बुटांसाठी किती मेहनत घ्यावी लागली, याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. आईस स्केंटिंगचे बूट भारतात उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांनी गुगलवर सर्च करीत कॅनडावरून ते मागवले. ते बूटही सृष्टीच्या पायामध्ये चपखल बसत नव्हते. पण, या बुटांमुळे धर्मेंद्र शर्मा यांना आईस स्केटिंगच्या बुटांची अचूक कल्पना आली. त्यांनी नागपूरमधून लोखंडी प्लेट विकत घेतली आणि कटर व ड्रील मशीन्सचा उपयोग करीत त्याला योग्य साईजमध्ये आणले. प्लेटचे कटिंग करताना एकदा त्यांच्या पायाच्या बोटाला दुखापतही झाली होती तर एकदा ड्रील मशीनमुळे त्यांच्या जांघेत दुखापत झाली होती. या घटनेमुळे सृष्टीची आई एवढी घाबरली की तिने तिच्या वडिलांना हा नाद सोडण्याचा सल्लाही दिला होता.
हा सल्ला मानतील ते धर्मेंद्र कसले. त्यांना वेध लागले होते मुलीला आईस स्केटिंगमध्ये सर्वोच्च स्थानी बघण्याचे. त्यांना या वेडाने एवढे झपाटले होते की, रात्री-अपरात्री उठून त्यांच्या डोक्यात आलेल्या कल्पनांचे ते टिपण करून ठेवत होते.
कार्यालयातून दुपारी घरी पोहचल्यानंतर भोजन घेण्याऐवजी ते सृष्टीच्या बुटांवर काम करण्यात व्यस्त असायचे. त्या वेडात ते खाणेपिणे विसरले होते. केवळ धर्मेंद्रच नाही तर सृष्टीची आईही त्यांना यात पूर्ण सहकार्य करीत होती. सृष्टीच्या ४० दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान पूर्ण कुटुंबीयांचा मुक्काम गुडगांवमध्ये होता. यादरम्यान कुटुंबीयांना पैशांची चणचणही भासत होती. एक दिवस तर असा आला की, पैसा जेवणावर खर्च करायचा की हॉटेलपर्यंत पोहचविणाऱ्या रिक्षाचालकाला द्यायचा, असा निर्णय घेण्याची वेळही या कुटुंबावर आली.
प्रतिकूल परिस्थितीला सामोरे गेल्यानंतर अखेर ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस उजाडला. सृष्टीने २८ डिसेंबर २०१७ रोजी १७.७८ सेंटिमीटर उंचीखालून १० मीटरचे अंतर पार करीत आपले नाव प्रतिष्ठेच्या गिनीज बुकमध्ये नोंदवले. गिनीज बुकतर्फे सृष्टीला २० सेंटिमीटरपेक्षा कमी उंचीचे लक्ष्य देण्यात आले होते, पण सृष्टीने हे लक्ष्य यापूर्वीच गाठले होते.
सृष्टी म्हणते, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कुठलेही लक्ष्य गाठणे अशक्य नसते. मुलींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर त्या मुलांच्या साथीने देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात.