SSC Exam Result; ‘तिच्या’ पायाच्या घोट्याचे झाले होते तब्बल सात तुकडे; तरी ‘ती’ चढली यशाची पायरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2023 10:07 PM2023-06-02T22:07:25+5:302023-06-02T22:07:49+5:30
Nagpur News पायाच्या घोट्याचे सात तुकडे झाल्याने ती चार महिने शाळेत जाऊ शकली नसतानाही खुशी गुप्ता या मुलीने ८६.४० टक्के गुण दहावीच्या परिक्षेत मिळवले आहेत.
शरद मिरे
नागपूर : ट्यूशन क्लासमध्ये पायऱ्यांवरून घसरल्याने डाव्या पायाच्या घोट्याचे तब्बल सात तुकडे झाले. एकाच वेळी दोन ऑपरेशन करावे लागले. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात ती चार महिने शाळेतच गेली नाही. अशाही परिस्थितीत वेदनांवर फुंकर घालत तिने यशाची पायरी चढली. दहावीच्या परीक्षेत ८६.४० टक्के गुण घेत यश संपादन केले.
खुशी राजकुमार गुप्ता, असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती स्थानिक विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी आहे. वडील राजकुमार यांचे किराणा दुकान आहे. ४ नोव्हेंबर रोजी तिचा अपघात झाला. ट्यूशन क्लासमध्ये पायरीवरून घसरल्याने ती थेट पहिल्या माळ्यावरून खाली घसरत आली. यात तिला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी तपासणी केली असता डाव्या पायाच्या घोट्यातील आतील हाडाचे सात तुकडे झाल्याचे सांगितले. पाठीतसुद्धा अशीच काहीशी जखम असल्याने एकाचवेळी दोन ठिकाणी ऑपरेशन केले गेले. मात्र, खुशी डगमगली नाही. वेदनांवर फुंकर घालत तब्बल चार महिने तिने जमिनीवर पाय न ठेवता बेडवर अभ्यास आणि फक्त अभ्यासच केला. वेदनादायी परिस्थितीवर मात करीत खुशीने ८६.४० टक्के गुण मिळवीत यशाची पायरी चढली.
खुशी ही आमच्या शाळेची टॉपर विद्यार्थिनी. अभ्यासात अतिशय हुशार असल्यामुळे दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम स्थान पटकावील असा सर्वांनाच विश्वास होता. मात्र, अपघातामुळे ती चार महिने शाळेतच येऊ शकली नाही. बेडवर सेल्फ स्टडी करीत, तिने यश मिळविले.
- ज्योती लांबट, मुख्याध्यापिका
विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, भिवापूर