मध्य प्रदेशातील बसेस सुरू झाल्यामुळे एसटीला फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:13+5:302021-09-10T04:11:13+5:30
नागपूर : मार्च महिन्यापासून नागपूर तसेच ग्रामीण भागातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या एसटीच्या बसेस बंद होत्या. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान ...
नागपूर : मार्च महिन्यापासून नागपूर तसेच ग्रामीण भागातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या एसटीच्या बसेस बंद होत्या. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान होत आहे. परंतु आता २ सप्टेंबरपासून मध्यप्रदेशातील फेऱ्या सुरू झाल्यामुळे दररोज एसटीला तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
नागपूर शहर तसेच ग्रामीण भागातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. तसेच मध्यप्रदेशातून नागपूरला मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात. एका दिवशी दोन हजार प्रवासी मध्य प्रदेशात प्रवास करतात. दररोज ११ हजार किलोमीटरचे अंतर या बसेस पार करतात. एका दिवशी एसटीला मध्य प्रदेशातील फेऱ्यांपासून तीन लाख तर महिन्याकाठी ८० लाख उत्पन्न मिळते. गणेशपेठ, घाट रोड, इमामवाडा, वर्धमाननगर, काटोल, रामटेक, सावनेर, उमरेड या आठही आगारातून एकूण ४२ फेऱ्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा, पचमढी, सौंसर, पांढुर्णा, सिवनी, खमारपाणी, खेरडी, लोधीखेडा येथे जातात. सहा महिने मध्य प्रदेशातील वाहतूक बंद असल्यामुळे एसटीचे ४ कोटी ८० लाखाचे उत्पन्न बुडाले. परंतु आता पुन्हा या फेऱ्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांसह एसटी महामंडळालाही दिलासा मिळाला आहे.
.................
एसटीचे उत्पन्न वाढले
‘मध्य प्रदेशातील बसेस बंद असल्यामुळे एसटीचे दररोज तीन लाखांचे नुकसान होत होते. परंतु आता पुन्हा मध्य प्रदेशातील वाहतूक सुरू झाल्यामुळे एसटीला चांगले उत्पन्न मिळत आहे.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
..............